शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा!” अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“संतापजनक! कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असं फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

आणखी वाचा- “महाराष्ट्र सरकार या सेलिब्रिटींचीही चौकशी करणार का?”; भाजपा नेत्याने शेअर केले स्क्रीनशॉर्ट्स

तसेच, “भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे.” अशी मागणी देखील फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. या शेतकरी आंदोलनावर आता सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया देणं सुरू केलं आहे. देशातील बॉलिवूड कलाकार, क्रीडा क्षेत्रासह अन्य दिग्गजांचाही यात समावेश आहे. या पैकी काहींनी हा आपला देश विभागण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगून, तसं होऊ देऊ नका असं आवाहन केलं आहे.

अमेरिकन पॉपस्टार रिहानानं शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाच्या उत्तरानंतर देशातील कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ट्विट करत देशाच्या अखंडतेचा पुनरुच्चार केला होता. यात भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनीही ट्विट केलं होतं.

ट्विट करण्यासाठी सेलिब्रिटींवर मोदी सरकारकडून दबाव?; ठाकरे सरकार करणार चौकशी

या सर्व पार्श्वभूमीवर  झूम मीटिंदरम्यान काँग्रेसकडून सेलिब्रिटींच्या ट्विटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सेलिब्रिटींवर दबाव टाकण्याता आला होता याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. त्यावर अनिल देशमुख यांनी गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी खासकरुन अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करण्यात आला. दोन्ही ट्विटमध्ये असणाऱ्या साधर्म्य आश्चर्यकारक असल्याचं सांगण्यात आलं.