राज्यातील विविध भागात सध्या उष्णतेची लाट आली असून विदर्भाला याचा सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. अकोल्यात बुधवारी विदर्भातील सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. हे गेल्या पाच वर्षांतील अकोल्यातील सर्वाधिक तापमान आहे. देशातील सर्वाधिक म्हणजे ४७.५ अंश सेल्सिअस तापमान राजस्थानातील बारमेर येथे मंगळवारी नोंदले गेले होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अकोल्याच्या तापमानाची नोंद आहे. आगामी दिवसांतही विदर्भाचा पारा चढताच राहणार असून पुढील ४८ तासांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान ४७ अंशाच्यावर पोहचेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. याशिवाय, आज नागपूरातही ४४.१ तर धुळ्यात ४५.६ इतक्या तापमानाची नोंद झाली. आज दिवसभरात नागपूरमध्ये तिघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मान्सून अंदमान-निकोबार द्विपसमूहामध्ये दाखल 
पाकिस्तान आणि राजस्थानमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे ही तापमानवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी मात्र कमाल तापमानात काहीशी घट होणार असून बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट ओसरेल, असे केंद्रीय वेधशाळेने अंदाजात म्हटले आहे. उष्णतेची लाट सध्या ओसरणार असली तरी ती अधेमधे पुन्हा येत राहील, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने उन्हाळ्याच्या दीर्घकालीन अंदाजपत्रकात व्यक्त केला होता.

मुंबईकर घामाने निथळले

मुंबईतील कमाल तापमान ३४ ते ३५ अंश से. दरम्यान असले तरी सापेक्ष आर्द्रता ६५ टक्क्य़ांहून अधिक आहे. त्यामुळे जाणवणारा उकाडा हा ४८ ते ५० अंश से. दरम्यान असतो.

त्यामुळे विदर्भ तसेच मराठवाडय़ाच्या तुलनेत कमाल तापमान फारसे दिसत नसले तरी घामाच्या धारांनी भिजलेल्या मुंबईकरांना जाणवणारे तापमान अधिक असते.