तीन जणांचा मृत्यू, पुरांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

नंदुरबार, यवतमाळ : गेले काही आठवडे दडी मारून बसलेल्या पावसाने पुनरागमन करताना राज्याच्या काही भागांना जोरदार तडाखा दिला. विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आदी जिल्ह्य़ांत पावसाने कहर मांडला आहे. नंदुरबार जिल्ह्य़ात पावसामुळे आलेल्या पुरात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
mumbai seven lakes have 27 percent water storage
मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर; जलचिंता वाढली, राज्यातही टंचाईचे सावट
Good availability of betel leaf from overseas at affordable rates
परराज्यांतील पानांमुळे विड्यांना रंग; जाणून घ्या… कुठून येतात राज्यात पाने?

पावसामुळे शेकडो घरांची पडझड झाली आहे. पिकांसह जनावरांचीही हानी झाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पर्लकोटा व वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.

नंदुरबार जिल्ह्य़ात पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आल्याने अधिक नुकसान झाले. नवापूर तालुक्यात सरपणी नदीच्या पुरात वाहून बालाहाट गावाजवळ जामनाबाई गावित (६५) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह मिळाला असून त्यांचे पती झाडाला लटकल्याने वाचले. खोकसा गावात पुरामुळे घराची भिंत कोसळून वतीबाई गावित यांचा मृत्यू झाला. चिंचपाडा गावात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला असुन त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. वाघाळीपाडा गावातील काशीराम गावित हे बेपत्ता आहेत.

गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून  बसलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत जोरदार हजेरी  लावून यवतमाळ जिल्ह्य़ात चांगलाच कहर केला. दिग्रस शहराजवळील धावंडा नदीला आलेल्या पुराने दिग्रसकरांचे श्वास रोखले गेले, तर अरुणावती नदीच्या पुराचे पाणी शहरात शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. उमरखेड, दिग्रस, महागाव, केळापूर तालुक्यातील दीडशेच्या वर गावात पाणी शिरल्याने अनेक ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यात आले. पैनगंगेच्या पुरामुळे विदर्भ-मराठवाडय़ाचा संपर्क तुटला.

उमरखेड तालुक्यातील सुकळी जहागीर येथे अंकुश महादेव साबळे हा  २४ वर्षांचा तरुण पुरात  वाहून गेला. आर्णी तालुक्यातील पैनगंगा नदीला आलेल्या पुराने कवठा बाजार गावात पाणी  शिरले. वणी तालुक्यातील निर्गुडा नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील शाळांना सुटी  देण्यात आली, तर मुकुटबन मार्गावरील पेटूर पुलावरील वाहतूक ठप्प पडली आहे. महागाव तालुक्यातील वाहणाऱ्या पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धारेगावात आलेल्या पुरात दहाच्या वर जनावरे वाहून गेल्याचे वृत्त आहे. आर्णी-माहूर, वणी-मुकुटबन हे  मार्ग बंद आहेत. दारव्हा तालुक्यातील तेलगव्हाणचा तलाव फुटल्याने गावात पाणी शिरले. नांदगव्हाण गावात मोटार बोट बोलावून गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पुसद तालुक्यातील पूस धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. निळोणा आणि चापडोह धरण ओव्हरफ्लो  झाले असून  विदर्भ आणि  मराठवाडय़ाच्या  सीमेवर असलेली पैनगंगा नदी दुथडी भरून  वाहत आहे.

चंद्रपूर-गडचिरोलीतही जनजीवन विस्कळीत

चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पर्लकोटा व वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. कोरपल्ली तलाव फुटल्याने धानाचे पीक व खंदला राजाराम येथे शेकडो शेळय़ा वाहून गेल्या. या एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पर्लकोटा नदीला पूर आल्याने शेकडो गावांशी संपर्क तुटला आहे. भामरागड-आलापल्ली मार्गही बंद झाला आहे. सावली तालुक्यातील वडोली नाल्याला पूर आल्याने यशवंत कुमरे(५२) हा इसम वाहून गेला.

जोरदार पावसाचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी पावसाला सध्या पोषक स्थिती असल्याने कोकणपासून विदर्भापर्यंत राज्याच्या सर्वच ठिकाणी कमी- अधिक प्रमाणावर सरी कोसळत आहेत. सोमवापर्यंत कोकण विभागात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ापासून दीर्घ विश्रांती घेतलेल्या पावसाने या आठवडय़ात सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीची चिंता काही प्रमाणात दूर झाली असून, राज्याच्या धरणांमधील पाणीसाठय़ातही समाधानकारक वाढ नोंदविली जात आहे.