|| दिगंबर शिंदे

अभूतपूर्व महापुराने उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांना मदत देण्याबरोबरच बाधित भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे. पूरग्रस्तांना शासकीय अनुदान वाटपाचे कामही शासकीय यंत्रणेमार्फत युद्धपातळीवरून सुरू असून पोलीस संरक्षणात हे वाटप करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांकडून आलेल्या मदत साहित्य संचाचे वाटपही युद्ध पातळीवर सुरू आहे.

महापुरामुळे विस्थापित झालेली कुटुंबे आता आपापल्या घरी परतत असून घराची स्वच्छता करणे, नुकसानीची पाहणी करणे ही कामे सुरू आहेत. याचबरोबर पाणीपातळी ओसरलेल्या सर्वच भागात स्वच्छतेची कामे गतीने सुरू आहेत. विविध सेवाभावी संस्था, महापालिकेसह राज्याच्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुरविलेल्या साधनांसह  आणि कर्मचाऱ्यांसह स्वच्छतेचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातही साथीचे आजार पसरू नयेत यासाठी स्वच्छतेबरोबरच औषध व धूर फवारणी करण्यात येत असून मृत जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने दफन करण्याचे कामही पूरग्रस्त भागात पूर्ण होत आले आहे.

पूरग्रस्त नागरिकांसाठी सामाजिक संस्था व कॉर्पोरेट कंपन्याकडून मोठ्या प्रमाणावर मदत साहित्य आले असून त्याचे वर्गीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येत आहे. या साहित्याचे संच तयार करून पूरग्रस्तांना वाटण्यात येत आहेत. या मदतसंच वाटपाचे शहरातील काम जवळपास पूर्ण झाले असून आता ग्रामीण भागात काही संस्थांच्या मदतीने या साहित्याचे वाटप सुरू आहे. या वाटपात गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक अथवा महसूल विभागाचे कर्मचारी यांना सोबत घेऊन वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. महापालिका क्षेत्रात स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर आणि रात्रीही सुरू ठेवण्यात आले असून जसे जसे पूरग्रस्त घरी परतत आहेत, तसा कचरा रस्त्यावर पडत आहे. यामुळे संपूर्ण स्वच्छतेचे काम पूर्ण होण्यास अद्याप चार ते पाच दिवस लागतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

मदतीसाठी मध्यवर्ती कक्ष

सध्या पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात मदत येत आहे. ही मदत नेमकी कुणापर्यंत आणि कशी पोहोचवायची याची मात्र मदत करणाऱ्यांना काहीही कल्पना नसल्याने सुरुवातीला या वाटपात काहीसा विस्कळीतपणा होता. तसेच काही वेळा ही मदत अडवून परस्पर लांबवण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. या सर्वाचा विचार करून मदत स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रत्येक तालुका पातळीवर तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षामार्फत येणाऱ्या मदतीचे वितरण नेमक्या ठिकाणी करणे सोपे होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८००७५४७३३३ किंवा ९३०७८३९९१० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पूरबाधित क्षेत्रातील एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही आणि कमीत कमी वेळेत त्याला घरपोच मदत मिळेल याची दक्षता जिल्हा प्रशासन घेत असून सुट्टीच्या दिवशीही सर्व यंत्रणा कार्यरत राहतील.       – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली</strong>