दोन जणांचा मृत्यू, दोन जण वाहून गेले; पांझरेला दुसऱ्यांदा महापूर; धुळ्यात चार पूल पाण्याखाली; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; शहादा जलमय

उत्तर महाराष्ट्रात गुरूवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या-नाल्यांना पूर आला असून पावसामुळे दोन जणांचा मृत्यू, तर दोन जण पुरात वाहून  गेले. अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पांझरा नदीला आठवडय़ात दुसऱ्यांदा महापूर आला आहे. धुळे शहरातील नदीकाठच्या भागात पाणी शिरले. शहरातील चार पूल पाण्याखाली गेले आहेत. जळगाव जिल्ह्य़ातील धरणगाव, यावल, अमळनेर आणि चोपडा या तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आल्याने तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्य़ात अतीवृष्टीने हाहाकार उडाला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहादा शहरात पाणीच पाणी झाले आहे.

चार दिवसांपूर्वी आलेल्या महापुरातून सावरत नाही तोच धुळ्याला पुन्हा महापुराचा तडाखा बसला आहे. रात्रभर मुसळधार पावसामुळे धुळे शहरासह साक्री, पिंपळनेरसह जिल्ह्याला धो-धो धुतल्याने पांझरासह सर्वच नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अक्कलपाडा धरणातून शुक्रवारी सकाळी ४३ हजार क्सूसेक विसर्ग करण्यात आला. दुपारी त्तो ५८ हजार ५०० क्सूसेकपर्यंत करण्यात आल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुनेगाव सामोडे येथील गुलाब घरटे जामखेली नदीतील पुरात वाहून गेले.

गुरूवारपासून धुळ्यात संततधार सुरु आहे. रात्री ११ नंतर पावसाचा जोर वाढला. हा पाऊस सकाळी आठपर्यंत सुरु होता. शिरपूर, साक्री, पिंपळनेर, निजामपूरसह काटवान परिसर, माळमाथा भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर नद्यांसह नाल्यांना पूर आला आहे. शिरपूर तालुक्यात फत्तेपूर (फॉरेस्ट) येथील मातीचा बंधारा फुटल्याने मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. अक्कलपाडा धरणाचे सात दरवाजे उघडल्याने पांझरा नदीपात्रात ५८ हजार ५०० क्यूसेक, अनेर धरणातून ४० हजार क्यूसेक तर बुराई धरणातून नऊ हजार क्यूसेक विसर्ग होत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तापी नदीला पूर आल्याने काठच्या गावांना अतीदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळी अक्कलपाडा धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यावर जिल्हाधिकारी गंगाथरण यांनी धुळे शहरातील सर्व शाळांना तत्काळ सोडण्याचे आदेश दिले. तसे संदेश सर्व शाळांना प्रशासनाकडून देण्यात आले. यामुळे पालकांची मोठी धावपळ उडाली. शहरातील पांझरा नदीवरील चारही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.  दुपापर्यंत कॉजवे, गणपती, एकविरा देवी मंदिरासमोरील पूल पाण्याखाली गेले. शहरातील मोठा पूल हा ब्रिटीशकालीन असल्याने खबरदारी म्हणून त्यावरील वाहतूकही तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अनेक घरेही खाली करण्यात आली. नेर येथे काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येत आहे.

शिरपूरमध्ये अरूणावतीच्या पुराचे पाणी

शिरपूर शहर आणि परिसरातील पावसामुळे अरुणावती नदीला १३ वर्षांनंतर पूर आला. याआधी २००६ मध्ये अरूणावती दुथडी भरून वाहिली होती. शिरपूर शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. पाचकंदिल बाजारपेठेतील दुकानदारांची सामान बाहेर काढण्यासाठी धावपळ उडाली. रामसिंगनगर, मच्छिबाजार, क्रांतीनगर या भागात पाणी शिरले. बुराई नदीला कित्येक वर्षांनंतर आलेल्या पुरामुळे शिंदखेडा तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली  पांझरा नदीचा पूर साक्री तालुक्यातील कासारे बाजारपेठेसह दुकानांमध्ये शिरला. साक्री तालुक्यातील फोफादेचा बुराई नदीच्या पुरामुळे तालुक्याशी संपर्क तुटला आहे.  प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत

जळगावच्या चार तालुक्यांमध्ये नुकसान

जळगाव जिल्ह्य़ात २४ तासात धरणगावसह यावल, अमळनेर आणि चोपडा या तालुक्यात अतीवृष्टी झाली असून जामनेर शहरातील कांग नदीत शुक्रवारी सकाळी पाण्यात बुडून  एकाचा मृत्यू झाला. तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. कृषी विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात धरणगाव तालुक्यात ८१.३ मिलिमीटर, यावल ७८.४, अमळनेर ७१.३ मिलीमीटर आणि चोपडय़ात ८७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात शुक्रवापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६३ टक्के पाऊस झाला आहे. तापी नदीवरील हतनूर धरण ३२.३९, गिरणा ५८.५९ तसेच वाघूर ३४.४९ टक्के भरले आहे. हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून दोन लाख १४ हजार १०९ क्सुसेस वेगाने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यात पावसामुळे रस्ते बंद पडल्याने सर्व लांब पल्लय़ाची बससेवा रद्द करण्यात आली. चोपडय़ातून वाहणारी रत्नावली दुथडी भरून वाहत आहे. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गावर वृक्ष कोसळल्याने रस्ता बंद झाला. लांब पल्लय़ाच्या पावागड, सूरत,इंदूर, वापी, बडोदा या रस्त्यावरील रद्द फेऱ्यांची माहिती चोपडा आगार व्यवस्थापक अहिरराव यांनी दिली. तालुक्यातील मितावली, हातेड, मामलदे, धानोरा, अडावद, वडती, मोहरद, लासूर, अकुलखेडा आदी ठिकाणी घरांची पडझड झाली. गूळ धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीला पूर आला आहे. मागील वर्षी नऊ ऑगस्टपर्यंत चोपडय़ात २८० मि.मि. पाऊस झाला होता. यावर्षी आजपर्यंत ४०५ मि.मि. पाऊस झाला आहे.

नंदुरबार जिल्हा जलमय

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने नंदुरबार जिल्हा जलमय झाला आहे. जिल्ह्य़ात एकाचा मृत्यू, तर एक जण वाहून गेला. सुमारे ४०० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्य़ातून जाणाऱ्या दोन्ही महामार्गासह अंतर्गत तालुक्यांना जोडणारे रस्ते देखील बंद झाल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.

तापीला पूर आला आहे. तर रंगावली, सुसरी, गोमाई, खर्डी, वरखेडी या नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. तळोदा तालुक्यात गुरुवारी पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाच जणांची सुटका करण्यात आली. मौजे मौलीपाडा येथील लिलाबाई पाडवी (५५) पुराच्या पाण्यात वाहून गेली. अक्कलकुवा-सोरापाडा दरम्यानच्या पुलावरुन खर्डी नदीचे पाणी वाहत असल्याने अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मोलगी-आमलीबारी दरम्यान  घाटातील रस्तावरचा पूल तुटल्याने या ठिकाणचा संपर्कदेखील तुटला आहे. शहाद्यातील उपकेंद्रात पाणी शिरल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गोमाई नदीचे पाणी शहरात शिरल्याने रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप आले आहे. स्टेट बँकेत कंबरेपर्यंत पाणी होते. शहादा तालुक्यातील २०० पेक्षा अधिक कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तालुक्यातील रायखेड येथ घराची भिंत पडल्याने कांताबाई भील (३६) यांचा मृत्यू झाला. नंदुरबार तालुक्यात १५० पेक्षा अधिक घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

रंगावलीच्या पुरामुळे नवापूर तालुक्यात रायंगणजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पूल खचल्याने वाहतूक ठप्प झाली. तापी नदीवरील सारंगखेडा आणि प्रकाशा या दोन्ही बॅरेजचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले असून सर्व मध्यम आणि लघु प्रकल्पांमधून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरु आहे. राज्य परिवहनने सावधगिरी म्हणून अनेक तालुक्यातील आपली सेवा थांबवली. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी दुपारनंतर शहादा शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.