23 November 2020

News Flash

अजित पवारांच्या शेजाऱ्याची आत्महत्या : “राष्ट्रवादीच्या धेंडांवर कारवाई करणं मुख्यमंत्र्यांना झेपेल काय?”

भाजपा नेत्याने अर्णब प्रकरणाची आठवण करुन देत उपस्थित केला सवाल

फाइल फोटो (फोटो सौजन्य : Twitter/AjitPawarSpeaks वरुन साभार)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारील घरामध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. पवार यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रीतम शाह यांनी आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे. यावरुनच आता भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करणं ठाकरे सरकारला झेपेल का असा टोला लगावला आहे.

काय आहे प्रकरण?

अजित पवार यांचे शेजारी असणाऱ्या शाह यांनी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. शाह यांच्या मुलाने बारामती पोलिसांकडे नऊ जणांविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणामध्ये सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून तीन जण फरार असल्याचे वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काही सावकार आपल्याला त्रास देत असल्याचे शाह यांनी म्हटलं आहे. याच लोकांच्या जाचाला आपण कंटाळलो असून निराशेमुळे आपण आत्महत्या करत आहोत, असंही या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. शाह यांच्या मुलाने या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात कोणाची नावं समोर आली?

शाह यांच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नगरसेवक जयसिंह देखमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रवणी गालिंदे, हनुमंत गवळी, सुनील अवाळे, संघर्ष गव्हाळे, मंगेश आमासे यांच्या नावांचा उल्लेख आहे. यापैकी एकजण बारामती बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहे. प्रीतम यांनी दाखल केलेल्या तक्रारीमधील जवळवजवळ सर्वजण राजकारणाशी संबंधित आहेत. आरोपींपैकी काहीजण नगरसेवक असून बारामती सहकारी बँकेच्या संचालकपदी असणाऱ्या व्यक्तीचाही आरोपींच्या यादीत समावेश असल्याचे वृत्त आहे. सावकारी प्रकरणामधून व्यापाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली बारामती पोलिसांनी शहरातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आणि शाह यांच्या मुलाने नावं घेतलेल्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य तिघांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे बारामतीत एकच खळबळ उडली आहे.

आणखी वाचा- अजित पवारांच्या शेजाऱ्याने केली आत्महत्या; चिठ्ठीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं

काय म्हणाले भातखळकर?

याच प्रकरणावर भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री महोदय जो निकष लावून अर्णब गोस्वामी यांना अटक केली, तोच निकष लावून आता या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धेंडांवर कारवाई करा…झेपेल काय?,” असं म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या अकाऊंटला टॅग केलं आहे.


दरम्यान, या प्रकरणातील आरोपींनी प्रतीम शाह यांना ३० टक्के व्याजाने पैसे दिले होते. प्रीतम यांनी हे सर्व पैसे परत केल्यानंतरही आरोपी त्यांच्याकडून अधिक पैशांची मागणी करत होते असा आरोप केला जात आहे. पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:56 pm

Web Title: hope thackeray government will have fair trial in case of ajit pawar neighbour suicide case says atul bhatkhalkar scsg 91
Next Stories
1 अजित पवारांच्या शेजाऱ्याने केली आत्महत्या; चिठ्ठीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं
2 निरंतर संघर्षाची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाली -राज ठाकरे
3 भाजपा राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करणार – चंद्रकांत पाटील
Just Now!
X