विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात एकमेकांवर निशाणा साधणं सुरू असल्याचं दिसत आहे. केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर त्यावर मुश्रीफ यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर फडणवीसांनी निशाणा साधला होता. आता फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर मुश्रीफ यांनी उत्तर दिलं असून, टोला देखील लगावल्याचं दिसत आहे.

”माझी तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो, पण त्यांना नट्याचं कशा आठवतात?” असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हणाले आहेत.

राज्यातील करोना स्थितीवरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जुगलबंदी सुरू आहे. याच मुद्दावरून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यावर मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देत गोयल यांना राज्यात कोणीही ओळखत नाही. ते राज्यातील मंत्री असूनही केंद्राकडून कसलीही मदत आणत नाहीत, अशी टीका केली होती.  त्यावर आज(सोमवार) फडणवीस यांनी मुश्रीफ म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहेत की माधुरी दीक्षित, असा सवाल करून गोयल यांच्यावर केलेले टीकेचा निषेध नोंदवला तसेच, मुश्रीफ यांनाही कोल्हापूरच्या बाहेर कोणी ओळखत नाही, असं म्हणाले.

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, ”करोनाचा संसर्ग वाढत असताना राजकारण न करता एकत्र या संकटाचा मुकाबला करणे गरजेचे आहे. केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी नागपूर येथे कसलाही गाजावाजा न करता मोठी मदत केली आहे. गोयल मदत मिळवून देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करीत असल्याने त्यावर बोललो असताना फडणवीस यांनी माझा उल्लेख करण्याची गरज नव्हती. करोना प्रतिबंधक लस महाराष्ट्राला मिळू नये, जेणेकरून जनता नाराज होऊन अराजक निर्माण होईल असा केंद्र शासनाचा डाव आहे. करोना झपाट्याने पसरत असताना मोदी -अमित शाह हे पश्चिम बंगालमध्ये जखमी महिलेचा पराभव करण्यासाठी रात्रंदिवस तळ ठोकून आहेत.” अशी टीका त्यांनी केली.