करोना व्हायरसला पराभूत करण्यासाठी लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वेळेबरोबर सगळया गोष्टी सुरळीत होतील असा आशावाद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.

“घरी असताना लोक वेगवेगळया समस्यांचा सामना करतायत, लोक कंटाळले आहेत हे मी समजू शकतो. पण COVID-19 ला पराभूत करण्यासाठी घरी थांबण्यावाचून पर्याय नाही” असे उद्धव ठाकरे म्हणाले. “करोना व्हायरसचा जिथून प्रसार झाला ते वुहान आता पूर्वपदावर येत असल्याचं मला वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजलं आहे. तिथे निर्बंध उठवले आहेत ही चांगली गोष्ट आहे. वेळेबरोबर सर्वगोष्टी सुरळीत होतील असाच त्याचा अर्थ होतो” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं

ज्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असतील त्यांनी खासगी दवाखान्यात न जाता क्युअर क्लिनिकमध्ये जावे. प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. त्याची माहिती देण्यात येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा- वुहानला ७० दिवस लागले…महाराष्ट्राला किती? जाणून घ्या काय म्हणाले उद्धव ठाकरे; १७ महत्त्वाचे मुद्दे

ज्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल असेल. थोडया जास्त प्रमाणात करोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरे हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये करोनाची अतीतीव्र लक्षणे आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत, त्यांच्यासाठी तिसरं रुग्णालय असेल. हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा- गैरसमज करून घेऊ नका, केंद्राच्या योजनेत फक्त तांदूळ; उद्धव ठाकरे यांचा खुलासा

उद्धव ठाकरे यांनी घरी व्यायाम करण्याचा सल्ला का दिला?
लॉकडाउनमुळे सध्या सर्वजण घरी आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वांना घरच्या घरीच व्यायाम करण्याचा सल्ला दिला. “करोना विरुद्धची लढाई आपण जिंकणारच आहोत. पण त्यानंतर आपल्याला अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर एक युद्ध लढायचं आहे. ते एक मोठ जागतिक युद्ध असू शकतं. त्यासाठी आपण शारीरिक, मानसिक दृष्टया खंबीर असलं पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरील लढाईसाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे” त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घरच्या घरी व्यायाम करण्याचा सल्ला दिला.