सबनीस यांची भूमिका; वादग्रस्त वक्तव्याचा मराठवाडय़ात निषेध
पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख आत्मीय भावनेतून केला. माझी चूक झाली असेल तर तीच! मात्र यात माझ्या भावना कोण समजून घेणार, असा प्रश्न उपस्थित करून अखिल भारतीय संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी माफी मागण्यास नकार दिला. ‘मी माझ्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल गौरवोद्गार काढले नसतील, तर मला मंत्रालयासमोर जाहीर फाशी द्या,’ असेही सांगत त्यांनी आपल्या वक्तव्याचे सर्मथन केले. सबनीस यांचा लातूर येथे मसापच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. जर्नादन वाघमारे होते.
लातूर येथे आज संध्याकाळी सबनीस यांचा कार्यक्रम कडेकोट बंदोबस्तात झाला. या वेळी सबनीस भाषणास उभे राहताच सभागृहातील उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बाहेर काढले. त्यानंतर सबनीस यांनी भाषणास प्रारंभ केला. ‘ संघ परिवारातील डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी, दीनदयाळ उपाध्याय, बाळासाहेब देवरस व मोहन भागवत या प्रात: स्मरणीय महापुरुषांनी त्यांच्या विचारांचे वाहक असणाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी,अशी प्रार्थना करतो,’ असे सबनीस म्हणाले. ‘मतभेद असू द्या, पण ते कोठे, केव्हा व कसे व्यक्त केले पाहिजे याचे भान असले पाहिजे. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांनी ‘आमच्या पंतप्रधानाबद्दल तुम्ही एकेरी उल्लेख का केला़’, असे विचारले असते तर मी त्याचे उत्तर दिले असते. कारण कार्यकर्त्यांंच्या दृष्ठीने ते पक्षीय नेते असतील. माझ्या देशाचे ते पंतप्रधान आहेत. माझ्या आईबद्दल मी जसा एकेरी उल्लेख करतो, त्याच भावनेतून एकेरी उल्लेख केला आहे. त्यांच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल काळजी वाटली व त्यांच्या धाडसाबद्दल गौरवोद्गारच काढले आहेत. त्यासाठी मोक ळी – ढाकळी भाषा वापरली. तेवढय़ासाठी मला खुनाच्या धमक्या येत असतील आणि दाभोलकर, पानसरे नंतर सबनीस या भावनेने कोणी धमक्या देत असेल तर मी घाबरणार नाही. माफी मागणार नाही. मी क्रांतिकारकाचा मुलगा आहे.

आठवले यांचा इशारा
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करण्याचे थांबविले नाही, तर पिंपरी येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उधळून लावू, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी श्रीपाल सबनीस यांना दिला आहे. गोध्रा हत्याकांड व गुजरातमधील दंगल हे देशातील विघातक कृत्य होते. परंतु त्यासाठी मोदी यांना दोषी ठरविणे चुकीचे आहे. माणूस हा परिवर्तनशील आहे. त्या काळात जे घडले, ते उगाळत बसण्यापेक्षा मोदी यांची आजची भूमिका काय आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. मोदी हे धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत. मात्र कुणीही उठावे व टीका करावी, हे रिपाइंचे कार्यकर्ते सहन करणार नाहीत, असे ते म्हणाले.
धमकी दिल्याने फिर्याद
पंतप्रधानांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर मराठवाडय़ात आलेल्या सबनीस यांना आज रोषाला सामोरे जावे लागले. उमरगा येथे व्याख्यानानिमित्त ते आले असता त्यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. तसेच लातूर येथे सत्कारापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जाऊन व्यासपीठावरील बॅनर फाडले. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. उमरगा येथे दोघांनी भ्रमणध्वनीवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद त्यांनी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सबनीस यांना पोलीस संरक्षण दिल्याचे समजते.