डॉक्टर व्हावं असं वाटलं होतं.. कदाचित डॉक्टर झालोही असतो. पण मी त्यादृष्टीने फारसे प्रयत्न केले नाहीत. होमिओपॅथीचा मात्र अभ्यास बराच केला आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली, याच मुलाखतीत हे वक्तव्य त्यांनी केलं आहे. ‘गेल्या काही दिवसांमध्ये तुमची वक्तव्यं मी ऐकली, त्यात जागतिक आरोग्य संघटनेलाही तुम्हीच मार्गदर्शन करता आहात की काय असं मला वाटलं इतकं आपलं डॉक्टरी ज्ञान समोर आलं..’ असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेला विश्वास हेच माझं बळ- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी  काय दिलं उत्तर?
” लहानपणी अनेकदा अनेक मुलांना प्रश्न विचारला जातो की मोठं झाल्यावर तू कोण होणार? आता नाही विचारलं जात. एका काळात विचारलं जायचं. सगळी मुलं या प्रश्नाला एक उत्तर द्यायची. त्याप्रमाणे मोठं होऊन ती व्हायचीच असं नाही. ते आपली इच्छा व्यक्त करायचे. वैद्यकिय शास्त्र हा माझ्यासाठी नेहमी कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. अगदी कदाचित.. नाही झालो ते बरं झालं.. पण एक शक्यता माझ्या मनात तेव्हा ही डोकावत होती की डॉक्टर व्हावं. त्या दृष्टीने मी फारसे प्रयत्न केले नाहीत. पण होमिओपॅथीचा मी अभ्यास करत होतो. आमच्याकडे एक बॉक्सच असायचा. त्या बॉक्समध्ये आर्सेनिक अल्बम, इतर गोळ्या असायच्या. आजोबा प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माँ या सगळ्यांचा होमिओपॅथीमध्ये अभ्यास होताच. त्या औषधांची माहिती त्यांना होती. त्यावेळी आम्ही आजारी झालो तर घरच्या घरी उपचार केले जायचे. तेव्हा होमिओपॅथीचे डॉक्टर्सही आमच्याकडे यायचे. अॅलोपथी हा विषय खूप दूर होता.”

आणखी वाचा- … त्यासाठी मी म्हणजे काही ट्रम्प नाही : उद्धव ठाकरे

आणखी वाचा- उद्धव ठाकरेंनी सांगितलं करोना काळामध्ये मंत्रालयात न जाण्याचं कारण, म्हणाले…

“तो काळ एकूण वेगळा होता. आत्तासारखे उपद्व्यापी व्हायरस वगैरे त्या काळात एवढे त्रासदायक नव्हते. एक चांगलं छान असं आयुष्य होतं. त्या काळात मी होमिओपॅथीचाही अभ्यास करत होतो. कळत-नकळत ती जी काय आवड आहे ती थोडीफार जिवंत आहे. काही वर्षांपूर्वी बीडला प्लेग आला होता. त्यावेळी मी डॉ. दीपक सावंत यांचं पथक पाठवलं होतं. ते पथक तिकडे गेले, औषधं कोणती लागतील, ती कुठून आणायची? मुंबईत पूर आला तेव्हा कोणती औषधं लागतील? हे मी सांगितलं होतं. मी माझ्या तळमळीने हे सगळं करत असतो. आत्ताही ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर आली. ती जबाबदारीही अशा काळात आली की जागतिक आरोग्य आणीबाणीचा हा काळ आहे. अशा काळात जबाबदारी आल्यावर खोलात जाणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. आज या विषयावर तज्ज्ञ असा कुणीच नाही. अनुभव आपल्याला शिकवतो आहे पण शहाणं व्हायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण शहाणं होण्याचा आपण तरी प्रयत्न करतो आहोत.” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.