विद्यार्थी चळवळीत होतो तेव्हा माझ्यावर नक्षलवादाचा प्रभाव होता, ज्या व्यवस्थेतून काही मिळत नाही ती आपण नष्ट केली पाहिजे असा विचार त्यावेळी मी करायचो अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादमध्ये दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात नितीन गडकरी बोलत होते.

काळानुसार विचार बदलला तरच विकास होतो, हे सत्य सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. एक काळ असा होता की, आम्ही कॉम्प्युटरला, मारूती कारला विरोध केला होता, मात्र या सगळ्यामुळे प्रगतीच झाली हे आम्ही आज पाहतो आहोत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे बांधत असताना शरद पवार काय भूमिका घेणार याची काळजी होती, शेतकरी नेत्यांकडून एकरी दहा लाख रूपयांची मागणी झाली होती. ते देणं काही आम्हाला त्यावेळी शक्य नव्हतं, मग त्यावेळी शरद पवार बोलायला पुढे आले, दोन्ही बाजूने रस्ता झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली, शेतकरी नेत्यांना समजावलं त्याचमुळे एवढा मोठा मार्ग उभा राहू शकला असंही गडकरी यांनी सांगितलं.

गरीब माणसाला केंद्रबिंदू ठेवून विकास साधला पाहिजे कामं केली पाहिजेत, शरद पवारांनी कायम हेच केलं असंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांची माणसांची पारख फार चांगली आहे, त्यांनी प्रत्येक भागातली हुशार माणसं निवडली आहेत, त्या माणसांना कधी सोडायचं याचंही टायमिंग त्यांना ठाऊक आहे असा टोला गडकरींनी लगावला. मोठे नेते आणि कोती मनं ही आजच्या राजकारणातली शोकांतिका आहे असं म्हणत गडकरींनी अशोक चव्हाण यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

विरोधी पक्षाबाबत महाराष्ट्रासारखं राज्य नाही, कारण इतर राज्यातले विरोधी पक्षातले नेते सत्ताधाऱ्यांशी बोलतही नाहीत. महाराष्ट्रात मात्र विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे राजकारणापलिकडचे संबंध आहेत ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती देशानं अंगिकारावी अशीच आहे. चांगले गुणात्मक नेते एकत्र आले तर देशात चांगलं परिवर्तनही घडू शकेल असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.