मी एकनाथ खडसेंना कोर्टात खेचणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी हे भाष्य केलं आहे. आता खैर नाही न्यायालयात खेचणार असं एका ओळीचं ट्विट करत अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांना इशारा दिला आहे. त्याआधीही त्यांनी एक ट्विट केलं आहे ज्यामध्ये जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हटलं आहे.

आज एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ खडसे यांनी जे भाषण केलं त्यात ते म्हणाले,  “मी भाजपासाठी चाळीस वर्षे दिली. या चाळीस वर्षांच्या बदल्यात मला काय मिळालं? एसीबीची चौकशी, भूखंड घोटाळ्याचे आरोप, विनयभंगाचे आरोप, बाई दिली नाही मागे लावली.” एकनाथ खडसे यांनी केलेल्या या वक्तव्याचा अंजली दमानियांनी गंभीर दखल घेत अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंना कोर्टात खेचणार असल्याचं म्हटलं आहे.

‘बाई दिली नाही.. मागे लावली’ हे असे उद्गार एकनाथ खडसेंनी काढले. किती किळसवाणा माणूस आहे हा. हे उद्गार एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसमोर काढले. एकालाही शरम आली नाही की सुसंस्कृती स्त्रीबद्दल हा माणूस काय बोलतो आहे? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी विचारला आहे.

काल काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया?

एकनाथ खडसे हे धादांत खोटं बोलत आहेत असाही दावा अंजली दमानिया यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता. एवढंच नाही तर एकनाथ खडसे हे खुनशी प्रवत्तीचे आहेत असाही आरोप त्यांनी केला. मी भाजपाचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण एकनाथ खडसे यांनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीही केला नाही असंही त्या कालच म्हणाल्या होत्या.  एकनाथ खडसे यांनी त्यांच्या वाढदिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं. वाट्टेल ते बोलले, त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा प्रकाराचं वक्तव्य शोभणारं नाही.