आमच्या घराण्याची ताकद मोठी होती, बाबा मंत्री होते मीही लोकांच्या आग्रहाखातर राजकारणात आले. बाबांनी धनंजयलाही आमदार केलं, इतकं सगळं होऊनही तो राष्ट्रवादीत गेला. धनंजय भाजपामध्ये असता तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. राजकारणात असं एकही घराणं नाही जिथे कुरुबुरी किंवा भांडणं नाहीत. सगळ्याच ठिकाणी कुरबुरी मात्र मुंडे कुटुंबीयांचीच चर्चा जास्त होते अशी खंतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

धनंजय मुंडे यांनी फक्त माझ्यावरच आरोप केले याचं दुःख आहे. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत मात्र त्यामुळे माझ्यावर भ्रष्टाचाराचे डाग उमटले असंही त्या म्हटल्या. लंडनमधल्या हॅकरने गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल व्यक्त केलेली शक्यता पंकजा मुंडे यांनी फेटाळली आहे. सीबीआय आणि पोलिसांनी तो अपघात होता हे स्पष्ट केलं आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे असंही त्या म्हटल्या. तसेच त्या हॅकरने सांगितलेल्या गोष्टीत काहीही तथ्य नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या न्यूज रुम चर्चेत पंकजा मुंडे यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. त्यातच त्यांनी प्रसंगी धनंजयसाठी राजकारणही सोडलं असतं असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत जे मी बोलले त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, राजकारणात मी माझ्या पद्धतीने काम करत जाते. मी कुणाशाही स्पर्धा करत नाही असंही त्या म्हटल्या. तसंच पुढच्यावेळी मी मंत्री असेन की नाही हे सांगता येत नाही असं म्हटलं नव्हतं, तर बालविकास खातं असेल की नाही हे ठाऊक नाही असं म्हटले होते असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. कारण पुन्हा आमचीच सत्ता येणार असल्याने कोणतं खातं मिळेल हे सांगता येत नाही असा त्याचा अर्थ होता. तसंच मुख्यमंत्र्यांनी आणि मी अनेक वर्षे सोबत काम केलं आहे, आमच्यात उत्तम संवाद आहे. कोणत्याही बातम्यांचा आमच्यावर परिणाम होत नाही असंही पंकजा म्हटल्या आहेत.