शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषणास बसलेल्या पाटिदार नेता हार्दिक पटेलला काही बरेवाईट झाल्यास मोदी-शहा यांना गुजरामध्ये जाऊन चहा-पकोडे विकण्यास भाग पाडू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. आज (शुक्रवारी) राजू शेट्टी यांच्यासह अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे प्रमुख व्ही. एम. सिंग यांनी अहमदाबाद येथे जाऊन हार्दिकची भेट घेतली त्यानंतर त्यांनी फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट लिहिली.


गुजरातमधील पाटीदार समाजाला ओबीसींच्या धर्तीवर आरक्षण मिळावे तसेच देशभरातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तसेच दीडपट हमीभाव मिळावा यासाठी हार्दिक पटेलचे गेल्या १४ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. शुक्रवारी दुपारी हार्दिकची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात हालवण्यात आले.

शेट्टींनी पोस्टमध्ये म्हटले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी २५ वर्षांचा तरूण आपला जीव पणाला लावून गेल्या १४ दिवसांपासून उपोषणास बसला आहे. तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत १०० दिवस उपोषण करून स्वत:चे मुत्र प्राशन केले. मात्र, या आंदोलनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष करून ते मोडीत काढले. त्याचप्रमाणे हार्दिकचे उपोषणही मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोपही शेट्टींनी केला आहे.

दरम्यान, देशातील शेतकऱ्यांना एकत्रित करून देशभर लढ़ा उभारण्यासाठी प्रयत्न करू, त्यामुळे आता हार्दिकने उपोषण मागे घ्यावे अशी विनंती राजू शेट्टी आणि व्ही. एम. सिंग यांनी केली आहे.