जळगाव: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यात विधानसभेच्या जागा वाटपाची आधीच चर्चा झाली आहे. शिवसेनेला जास्त जागा मिळाल्यास आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असा पुनरूच्चार शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी येथे केला.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारपासून जळगावातून जनआशीर्वाद यात्रा सुरू करणार आहेत. या पाश्र्वभूमिवर आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी युतीत मुख्यमंत्रिपदाचा कोणताही वाद नसल्याचे सांगितले. युती करतांना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्याबाबत ठरविलेले आहे. आदित्य यांच्यामध्ये नेतृत्वाचे सर्व गुण आहेत. राज्यातील जनतेची आणि सेनेचीही इच्छा आहे की ते मुख्यमंत्री व्हावेत, असेही राऊत यांनी नमूद केले.

यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ, शहरप्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते.