शिवसेनेला काँग्रेससोबत यायचे असेल तर हायकमांडशी संपर्क साधावा असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेनेला काँग्रेसने थेट सोबत येण्याची ऑफरच दिली आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये बरे चाललेले नाही हे आता सर्वश्रुत आहेच. शिवाय काही दिवसांपूर्वीच यापुढील निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. अशात आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेला काँग्रेससोबत यायचे असेल तर हायकमांडशी चर्चा करावी असे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. औरंगाबादमध्ये काँग्रेसचे व्हिजन २०१९ शिबीर सुरु आहे. त्याच निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

भाजप आणि शिवसेना यांच्यातून सध्या विस्तव जात नाहीये. तरीही दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. भाजप शिवसेनेला साम-दाम-दंड-भेद नीती वापरून स्वतःसोबत ठेवणार आहे असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. शिवसेनेने सत्तेला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांना जर काँग्रेसशी हातमिळवणी करायची असेल तर त्यांनी हायकमांडशी संपर्क साधावा याबाबत मी आणखी काही बोलणार नाही असे चव्हाण यांनी म्हटले आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस यांची सत्ता आहे. त्यातच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ही नवी समीकरणांची नांदी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तसेच यावर शिवसेनेची काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची सत्ता आल्यापासून शिवसेनेने भाजपचे जे निर्णय पटणार नाहीत त्यावर आक्रमक आणि रोखठोक भूमिका घेतली आहे. सत्तेत राहून विरोधकांची भूमिकाच एक प्रकारे शिवसेनेने पार पाडली आहे. तरीही सत्ता सोडलेली नाही. आजवर अनेकदा शिवसेनेने सत्ता सोडावी आणि मग भाजपविरोधात बोलावे असे विरोधकांनी म्हटले आहे. अशात आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकां एकत्र घेण्याची चर्चा सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे हे नक्की!