*  ठेकेदाराकडून सर्रास नियमभंग
*  महसूल खात्याचा आशीर्वाद
लिलाव झालेल्या वाळू घाटातील वाळूचा रात्री उपसा करू नये, या शासन नियमाला तिलांजली देत महसूल अधिकारी व तलाठय़ाच्या साक्षीने धाडनजीकच्या इरला गावच्या धामना नदीतून रात्री अपरात्री मोठय़ा प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा करण्यात येत आहे. आतापर्यंत या वाळू घाटातून शेकडो ब्रास अवैध उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यात आला आहे. यासंदर्भात तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे बऱ्याच तक्रारी करण्यात आल्या आहेत.
महसूल प्रशासनाने चांडोळपासून जवळच असलेल्या इरला येथील धामना नदीतील वाळू घाटाचा लिलाव केला आहे. वास्तविक, नियमानुसार सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर घाटातील वाळू उपशाला प्रतिबंध करण्यात आला आहे, परंतु ठेकेदारांकडून या नियमाची पायमल्ली करून शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन करून विविध वाहनांद्वारे या वाळूची अवैध वाहतूक केली जात आहे. परिणामी, नदीपात्रात मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले असून नदी काठानजीकच्या विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे सिंचनात अडसर निर्माण होऊन रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत. वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक महसूल अधिकारी व तलाठय़ांच्या सौजन्यामुळे होत असल्याच्या तक्रारी आहेत.
प्रचंड प्रमाणावर होत असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे नदीच्या पात्रात मोठय़ा प्रमाणावर खड्डे निर्माण होऊन नदी पात्राच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.
नदीचे पात्र बदलण्याची शक्यता निर्माण झाल्याने आजूबाजूचे शेतकरी घाबरले आहेत. ठेकेदाराने आतापर्यंत अवैधरित्या केलेल्या वाळू उत्खनन व वाहतुकीची स्वतंत्र पथकाद्वारे चौकशी करण्यात येऊन अवैध वाळूच्या संदर्भातील दंडात्मक कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी होत आहे. या परिसरातील धामणा व अन्य नद्यांच्या वाळू घाटातील अवैध व रात्रीचे उत्खनन बंद करण्यात यावे, अशीही मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.