करोनाचे भयसंकट वरचेवर वाढत असल्यामुळे सोलापूरकर अधिकच चिंताग्रस्त असताना बहुसंख्य खासगी दवाखाने व डॉक्टरांनी खंडीत केलेली रूग्णसेवा अद्यापी सुरू केली नसल्याने सोलापूर महापालिकेने संबंधित २८ दवाखान्यांविरूध्द कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. तथापि, आता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) सोलापूर शाखेने शहरातील जवळपास सर्व खासगी दवाखान्यांसह संबंधित डॉक्टरांची ओपीडी व आयपीडी सुरूच असल्याचा दावा लेखी स्वरूपात जिल्हाधिका-यांकडे केला आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, करोना विषाणूचा फैलाव सोलापुरात वाढतच चालल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एका आदेशान्वये शहराच्या पूर्वभागातील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय करोनाबाधित रूग्णांवरील उपचारासाठी ताब्यात घेतलं आहे. या रूग्णालयात दोनशे खाटांची व्यवस्था उपलब्ध आहे. शहरात बहुतांशी करोनाबाधित रूग्णसंख्या पूर्वभागातच आहे. त्यामुळे श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय ताब्यात घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रूग्णालय तसेच डॉ. कोटणीस स्मारक रेल्वे रूग्णालय ताब्यात घेण्यात आले आहे. या कार्यवाहीमुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयावरील रूग्णांचा वाढता भार कमी होण्यास मदत होणार आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव जसा सुरू झाला, तसे शहरातील बहुसंख्य खासगी छोटे व मध्यम आकाराचे दवाखाने, प्रसूतिगृहे, बालरूग्णालयातील ओपीडी व आयपीडी बंदच आहे. खासगी डॉक्टरांचे क्लिनिकही बंद आहेत. काही डॉक्टरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ओपीडी सेवा चालवत असल्याचे बोलले जाते. तर काही मोजक्याच डॉक्टरांनी रूग्णसेवा खंड न पाडता पूर्ववत चालविल्याचे सांगितले जाते. बहुतांशी दवाखान्यांमध्ये एखादा रूग्ण आलाच तर, तो कोठून आला, करोना प्रादुर्भाव असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील आहे काय, याची सूक्ष्म चौकशी केली जाते आणि मगच रूग्णसेवा द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जातो. प्रतिबंधित क्षेत्रातील राहणाऱ्या रूग्णाला अगोदर शासकीय रूग्णालयात जाऊन करोना चाचणी करून घेण्यास सांगितले जाते. दुसरीकडे करोनाशी लढण्याकरिता लागणारी उपकरणे नाहीत म्हणून रूग्णसेवा नाकारली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बिगरकरोना रूग्णांचे वैद्यकीय सेवेअभावी हाल होत असून वेळेवर वैद्यकीय उपचाराअभावी हृदयविकार, किडनी, मेंदू, अर्धांगवायू, कर्करोग आदी आजारांनी त्रस्त असलेल्या रूग्णांच्या मृत्युचे प्रमाणही वाढल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे.

या परिस्थितीत खासगी डॉक्टर व त्यांच्या दवाखान्यांकडील रूग्णसेवा तात्काळ सुरू होण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वाढत असताना अखेर प्रशासनाने संबंधित २८ दवाखान्यांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय सेवेसाठी समन्वयक म्हणून जबाबदारी घेणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोलापूर शाखेने शहरातील जवळपास सर्व खासगी दवाखाने बंद नसून तर पूर्ववत सुरूच असल्याचा दावा केला आहे. बंद असलेले काही मोजके दवाखाने प्रतिबंधित क्षेत्रातील असल्याचाही निर्वाळा दिला आहे. सुरू असलेल्या दवाखान्यांसह ओपीडी व आयपीडी चालविणा-या १२८ खासगी डॉक्टरांची यादी जिल्हाधिकारी शंभरकर यांना सादर करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांसह अनेक लोकप्रतिनिधींनी खासगी दवाखाने व डॉक्टरांची रूग्णसेवा बंद असल्याबद्दल ओरड चालविली आहे. अनेकांनी याबाबतचे अनुभवही सांगितले आहेत. यासंदर्भात प्रशासनाने सत्यता तपासावी. त्यासाठी प्रशासनाने स्वतः एखादा रूग्ण संबंधित खासगी दवाखान्यात पाठवून तेथील रूग्णसेवेची खात्री करावी. बंद आढळलेल्या दवाखान्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

खासगी दवाखाने सुरूच 

सोलापुरात काही अपवाद वगळता बहुसंख्य खासगी दवाखाने आणि तेथील ओपीडी व आयपीडी सुरू आहे. यासंदर्भात संबंधित दवाखाने व डॉक्टरांची यादी जिल्हाधिका-यांना सादर करण्यात आली आहे. खासगी दवाखाने बंद असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य दिसत नाही, असे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. हरिष रायचूर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.

खासगी दवाखान्यांचा बेजबाबदारपणा

सोलापुरात एकीकडे करोना विषाणू फैलावाने कहर केला असताना खासगी दवाखाने आणि डॉक्टरांनी रूग्णसेवा बंदच ठेवली आहे. हा बेजबाबदारपणा आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली आहे.