आघाडी शासनाच्या काळात भाजपा आमदारांशी घेतलेला पंगा मिरजेतील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना महागात पडला असून या प्रकरणी युती शासन येताच अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित होताच तातडीने बदली करण्यात आली. विविध रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात कुचराई केल्याच्या कारणावरून मिरजेचे कार्यकारी अभियंता एम. बी. वाघमारे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
मिरजेतील आ. सुरेश खाडे यांची आघाडी शासनाच्या कालावधीत तत्कालीन पालक मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या समोरच जोरदार खडाजंगी झाली होती. मात्र कदम यांनी समजूत काढून वाद संपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कार्यकारी अभियंता श्री. वाघमारे यांनी या प्रकरणी वृत्तपत्रातून आमदार खाडे यांची बदनामी करण्याचे आरोप करण्यात आले. यातून हा संघर्ष धुमसत राहिला.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होताच आ. खाडे यांनी मिरज तालुक्यातील रस्त्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून या वादात भ्रष्ट आणि कर्तव्यात कसूर करणा-या वाघमारे यांच्यावर कारवाईची मागणी केली. इचलकरंजीचे आ. सुरेश हळवणकर यांनीही या मागणीला पाठिंबा देत लोकप्रतिनिधीशी बेताल वागणा-या अधिका-यांवर कारवाईचा आग्रह धरला होता.
विधानसभेत चच्रेला उत्तर देताना बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कारवाईचे आश्वासन देत श्री. वाघमारे यांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी सायंकाळी बांधकाम विभागाचे उपसचिव एस. डी. सूर्यवंशी यांनी वाघमारे यांच्या बदलीचे आदेश दिले असून त्यांना तत्काळ कार्यभार सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कार्यकारी अभियंता यांच्या कारभाराबाबत सार्वत्रिक नाराजी तीव्र स्वरूपाची होती. याबाबत आ. खाडे यांनी वेळोवेळी त्यांना समजावून सांगण्याचे प्रयत्न केले होते. मात्र वरिष्ठ पातळीवर असणा-या राजकीय संबंधांमुळे त्यांनी लोकप्रतिनिधीस न जुमानता कारभार करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या अंगलट आले असल्याचे मानले जात आहे.