उस्मानाबाद जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येने सोमवारी आजवरचा दिवसभरातील करोना रुग्ण संख्येचा उच्चांक गाठला असून, दिवसभरात 45 नवे करोनाबाधित आढळले आहेत. उमरगा तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 553 वर पोहचली असून 338 जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे. 187 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून 28 जणांचा आतापर्यंत करोनामुले मत्यू झाला आहे.

सोमवारी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून अंबाजोगाई येथे पाठविलेल्या 200 स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. यामधील 37 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 161 जणांचा अहवाल निगेटिव्ह असून दोघांचे अहवाल संदिग्ध आहेत.

सोमवारी उस्मानाबाद शहरातील उंबरे गल्ली येथील 60 वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणीत उस्मानाबाद शहरातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या वसतिगृहातील आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

उमरगा तालुक्यात सर्वाधिक 26 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. यामध्ये उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, पतंगे रोड, अजय नगर, सानेगुरूजी नगर या भागांसह तालुक्यातील गोंधळवाडी, घोटाळ, मुळज येथेही रुग्ण आढळले आहेत.

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील एकाच कुटुंबातीलल 5 जणांचा समावेश आहे. तसेच अणदूर येथेही 2 वृद्धांचा समावेश आहे.  पररंडा तालुक्यातील बावची येथे 1, वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे 2 आणि भूम तालुक्यातील राळेसांगवी येथे 1 वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आज उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील 59 वर्षीय करोनाबाधिताचा जिल्हा रुग्णालयात तर उमरगा येथील 38 वर्षीय तरुणाचा सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाहेरील जिल्ह्यांमध्ये उपचार घेत असलेल्या 7 जणांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सोमवारी करोनाबाधितांची संख्या 45 वर पोहचली आहे.