नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गुरुवारी पुण्यात हिंसक वळण लागले. दुपारी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती. या तोडफोडीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून आंदोलकांनी आतमध्ये प्रवेश केला. गेटची तोडफोड केली तसेच वॉचमन केबीनचीही तोडफोड केली. ही सगळी मुले १८ ते २० वर्षांची होती असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या या महाराष्ट्र बंदचे पुण्यात तीव्र पडसाद उमटले. सकाळपासून पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देतानाच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी रॅलीही काढली होती. पुण्यात हयात हॉटेलमध्ये घुसूनही आंदोलकांनी तोडफोड केली. चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यानंतर आंदोलकांनी पुणे बंगळुरू महामार्ग रोखला.