रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा ४२८ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात ३१ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील २०, पनवेल ग्रामिण मधील ७, खालापूर मधील २ महाड मधील १ आणि पेण मधील एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल ग्रामिण येथील एका रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ११ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील १हजार ७९० जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील १३०० जणांचे अहवाल नकारात्मक आले. ४२८ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ६२ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. १२७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या २८६ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ११६, पनवेल ग्रामीण हद्दीतील ६४, उरणमधील ९८, अलिबाग ४, तळा येथील १, खालापूर २, महाड १ तर पेण मधील एका करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाड येथील परिचारीका करोनाबाधित
महाड ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारीकेला करोनाची लागण झाली आहे. तिचा स्वॅब तपासणी अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला. महाड ग्रामीण रुग्णालयातच तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पेण मध्ये ९ वर्षाच्या मुलाला करोना
पेण तालुक्यातील वडखळ ९ वर्षाच्या मुलाला करोनाची लागण झाली आहे. तो मुंबईतील वाडीया रुग्णालयात गेला होता. त्यावेळी त्याला करोनाचा संसर्ग झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.