अलीकडच्या काळात स्पष्ट बोलायची सोयच राहिली नसल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पूर्वी नेते परखड मतं मांडायचे, आता परखड बोलल्यावर त्यावर काय उत्तर मिळेल, याचा नेम नाही. त्यामुळे भाषण करतेवेळी सांभाळून बोलावं लागतं. त्यामुळे हल्ली अनेकजण भाषण रंगत नसल्याची तक्रार करतात. पण भाषणं रंगणार तरी कसं, कारण आता तुम्ही जे बोलाल त्याचा नंतर काय अर्थ निघेल सांगता येत नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.

औरंगाबाद येथे ज्येष्ठ राजकारणी बाळासाहेब पवार यांच्यावर आधारित नितीधुरंधर पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अलीकडे स्पष्ट बोलता येत नाही. कारण तुम्ही जे बोलाल त्याचा नंतर काय अर्थ निघेल सांगता येत नाही. हल्ली भाषणात विनोदही करता येत नाही. नंतर विनोदाचा तेवढाच भाग काढून कोण किती दिवस चालवेल आणि तुम्हाला ठोकून काढेल हे सांगता येत नाही असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले. तत्पूर्वी फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विखे-पाटील यांनी सोशल मीडियामुळे अनेक बंधने आल्याचे सांगितले. आम्ही काय बोलावं, काय बोलू नये, आम्ही काय खातो, कोणत्या ताटात खातो, हे सर्व सोशल मीडियावर येते आणि त्यावर चर्चा रंगतात असे ते म्हणाले.