राज्यात आठवडाभर घटलेल्या किमान तापमानात शुक्रवारी काही प्रमाणात वाढ झाली, तर कोकणातील कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली. मराठवाडय़ात शुक्रवारी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. विदर्भात काही ठिकाणी किंचित घट, तर उर्वरित ठिकाणी ते सरासरीच्या जवळपास होते.

राज्यात सोमवारपासून अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंशाखाली घसरले. सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांची घट झाली होती, मात्र गुरुवारपासून वाढ होऊ लागली. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या नोंदीनुसार विदर्भ वगळता इतरत्र किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. पुढील दोन दिवस तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ९.४ अंश नोंदवण्यात आले. विदर्भात १० ते १५ अंश, मराठवाडय़ात १२ ते १४ अंश, मध्य महाराष्ट्रात १२ ते १८ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. मुंबईत सांताक्रूझ किमान तापमानात दोन अंशांची वाढ होऊन १८.८ अंश, तर कुलाबा येथे २१.२ अंश तापमान नोंदवण्यात आले. कोकणात बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशाच्या आसपास होते. कोकण वगळता राज्यभरात कमाल तापमानात विशेष बदल झाला नाही. जमिनीलगत येणाऱ्या दक्षिणेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारी कोकणात सर्वत्र कमाल तापमानात वाढ झाली. मुंबईत कुलाबा व सांताक्रूझ येथे तापमानात एक अंशाने वाढ नोंदवण्यात आले.