|| नीरज राऊत

पालघर जिल्ह्यत २६ दिवसांत १५,५३८ मतदारांची नोंदणी; नेमके कारण शोधण्यात अपयश:- पालघर जिल्ह्य़ातील नालासोपारा, बोईसर व वसई या मतदारसंघांत गेल्या दीड वर्षांपासून मतदारांच्या संख्येत झपाटय़ाने वाढत होत असून या भरमसाठ वाढीमागील नेमके कारण आणि त्यामागील सूत्रधार शोधण्यास शासकीय यंत्रणांना अपयश आले आहे. १७ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत १५,५३८ जणांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. एकीकडे नव्याने गृहसंकुले व वसाहती उभारण्याचे काम मंदगतीने सुरू असताना या तीन मतदारसंघांत मतदारांच्या संख्येमध्ये होणारी वाढ चिंतेची बाब ठरत आहे.

२०१४ ते २०१९ या कार्यकाळात पालघर जिल्ह्यत तीन लाख सात हजार मतदारांची वाढ झाली होती आणि त्यांपैकी एक लाख ५४ हजार मतदार हे पालघरच्या मे २०१८ मधील पोट निवडणुकीनंतर वर्षभराच्या कालावधीत वाढले होते. विशेष म्हणजे त्यापैकी ७२ हजार मतदार हे निवडणुकीपूर्वीच्या अखेरच्या तीन महिन्यांत वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने मतदारांची नोंदणी करणारी यंत्रणा सदोष असल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ  लागला होता.

ऑनलाइन पद्धतीने नव्या मतदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच राहत असून लोकसभा निवडणुकीनंतर एप्रिल ते ऑगस्ट २०१९ या दरम्यान जिल्ह्यात ५० हजार ८३३ मतदार वाढल्याची नोंद झाली होती. या वेळी नालासोपारा मतदारसंघात २४ हजार ७९७, बोईसरमध्ये १२,७२३ तर वसईमध्ये ७,६१७ मतदारांची वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले होते.

१७ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत मतदार नोंदणीचा सपाटा जलद गतीने सुरू झाला. शासकीय सुट्टय़ा वगळता या २६ दिवसांच्या कालावधीत सरासरी सहाशे मतदार प्रतिदिन या दराने तब्बल १५ हजार ५३८ मतदारांची संख्या वाढली आहे. त्यापैकी नालासोपाऱ्यात ६,७२५, बोईसरमध्ये ४,७६२ तर वसईमध्ये २,५२२ अशी वाढ नोंदविण्यात आली आहे. यादरम्यान शासकीय सुट्टय़ांचा विचार करता वसई मतदारसंघात दररोज सरासरी शंभर मतदारांची वाढ झाली असून नालासोपाऱ्यात २६० तर बोईसरमध्ये १८५ मतदार प्रतिदिन नोंदविण्यात आले आहेत. आपले दैनंदिन कामकाज सांभाळून तसेच मुसळधार कोसळणाऱ्या पावसात इतक्या झपाटय़ाने आणि कार्यक्षमतेने मतदार नोंदणी कोणत्या पद्धतीने पार पडली याबद्दल संशय निर्माण होत आहे.

मतदारवाढीचा हा दर भयावह असून यापेक्षा अधिक गतीने लोकसभा निवडणुकीनंतर व त्यापूर्वी वर्षभराच्या कालावधीत मतदार नोंदणी झाल्याचे दिसून आले आहे. नालासोपारा, वसई व बोईसर या मतदारसंघांमध्ये मोठय़ा प्रमाणात मतदार नोंदणी झाल्याने त्याची माहिती पालघरच्या जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक विभागाला दिली आहे. मतदारांची नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत असल्याची तसेच नव्या मतदारांच्या पुरव्याची पडताळणी संबंधित मतदान केंद्र अधिकारी आणि तालुका मतदान अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

नावे वगळण्याचे प्रमाण अत्यल्प

जलदगतीने मतदारांची नोंदणी होणाऱ्या नालासोपारा मतदारसंघात १७ ऑगस्ट ते २४ सप्टेंबरदरम्यान नालासोपारा मतदारसंघात ६,८१६ नव्या मतदारांची नोंद झाली असून ९१ मतदार वगळण्यात आले आहेत. त्याचबरोबरीने बोईसर मतदारसंघात ४,८३१ नव्या मतदारांची नोंद झाली असून या कालावधीत ६९ मतदारांची नावे वगळण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.