महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, वन खात्यापुढे व्याघ्र संरक्षणाचे आव्हान
नागपूर : भारतात सलग दोन वर्षांपासून वाघांच्या मृत्यूची वाढती आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या सहा महिन्यांत ८६ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्र मांकावर आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत देशात वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात १५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील दोन व्याघ्रगणनांमध्ये वाघांची संख्या वाढलेली दिसत असतानाच मृत्यूच्या वाढणाऱ्या आकडेवारीने वन खात्यासमोर व्याघ्रसंरक्षणाचे आव्हान निर्माण केले आहे.
‘क्ला’- कन्झर्वेशन लेन्सेस अँड वाईल्डलाइफ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेकडून वाघांच्या मृत्यूसंदर्भात माहिती संकलित केली जाते. संपूर्ण देशात मागील दीड वर्षांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात जिथे मानवी मृत्युदर वाढला तिथे वाघांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले. या दोन्ही मृत्यूचा एकमेकांशी थेट संबंध नाही. मात्र, दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात करोनाचा अधिक प्रभाव जाणवत असताना वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनाही त्याची झळ बसली. त्याचा परिणाम व्याघ्र संरक्षणावर झाला. वाघांच्या मृत्यूमध्ये मध्य प्रदेश पहिल्या, महाराष्ट्र दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या क्र मांकावर आहे. ३० जून २०२१ पर्यंत ८६ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जुलैमध्ये तीन वाघ मृत्युमुखी पडले आहेत. यात वाघांच्या अवयव जप्तीची नोंद नाही. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मात्र ७२ मृत्यूची नोंद के ली आहे. प्राधिकरणाच्या अहवालानुसार, पाच किं वा त्याहून अधिक वाघांच्या अवयवांच्या जप्तीची प्रकरणे आहेत. २०२० या वर्षांत वाघांचे ९८ मृत्यू नोंदवण्यात आले. त्यापैकी ५६ मृत्यू जून २०२० पर्यंत म्हणजेच पहिल्या सहा महिन्यांतील होते. २०१९ या संपूर्ण वर्षांत वाघांच्या मृत्यूची ८४ प्रकरणे नोंदवण्यात आली. सलग तीन वर्षांच्या आकडेवारीवरून वाघांचा मृत्युदर वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे. या वर्षी पहिल्या तीन महिन्यांतच संपूर्ण भारतात ३९, तर सहा महिन्यांत ८६ वाघ मृत्युमुखी पडले.
राज्यनिहाय मृत्यू
२२ महाराष्ट्र
२६ मध्यप्रदेश
०८ उत्तर प्रदेश
०३ केरळ
०१ तमिळनाडू
०६ उत्तराखंड
०२ बिहार
०१ प. बंगाल
११ कर्नाटक
०४ आसाम
०२ राजस्थान
व्याघ्रसंरक्षणासाठी जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वर्षभराच्या प्रयत्नानंतर आकडेवारी मिळवण्यात आली. वाघांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घ्यायचा असेल तर वेळ आणि कष्ट करण्याची तयारी आवश्यक आहे.
– सरोश लोधी, संस्थापक सदस्य, ‘क्ला’- कन्झर्वेशन लेन्सेस अँड वाईल्डलाइफ
