राज्याचे माजी महाधिवक्ता आणि वेगळ्या विदर्भाचे कट्टर समर्थक श्रीहरी अणे यांच्यावर गुरुवारी दिल्लीत एका कार्यक्रमात शाई फेकण्यात आली. यावेळी शाई फेकणाऱ्यांकडून वेगळ्या विदर्भाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलीसांनी शाई फेकणाऱ्या तातडीने बाजून करून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी, आमच्याच कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याचे वृत्तवाहिन्यांना सांगितले. पण काहींनी शाई फेकणारे शिवसैनिक असल्याचे म्हटले आहे.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीहरी अणेही तिथे उपस्थित होते. यावळी ते बोलण्यासाठी उभे राहिल्यावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या अंगावर शाई फेकली. त्यांच्या दिशेने बाटल्याही फेकण्यात आल्याचे समजते. श्रीहरी अणे यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या इतर व्यक्तींच्या कपड्यांवर शाईचे डाग उमटल्याचे वृत्तवाहिन्यांकडील चित्रीकरणावरून दिसते आहे. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी लगेचच शाईफेक करणाऱ्यांना घटनास्थळावरून बाजूला नेले. शाईफेक करणारे वेगळ्या विदर्भाच्या विरोधात घोषणा देत होते.