एसटीचा निर्णय, विमानतळ प्रशासनाकडूनही मंजुरी

मुंबई : एसटी महामंडळाने सुरू केलेल्या बोरीवली व्हाया मुंबई राष्ट्रीय विमानतळ ते स्वारगेट शिवनेरी सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता महामंडळाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते स्वारगेट शिवनेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बाहेरगावाहून पुण्याला जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध न झाल्यास अनेक जण मुंबईत उतरतात. त्यानंतर विमानतळाबाहेरून पुण्याला जाणारी खासगी टॅक्सी करतात. यात जास्तीचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे अशा प्रवाशांना एसटी प्रवासासाठी आकर्षित करताना स्वस्त दरात प्रवास घडवण्यासाठी बोरीवली व्हाया मुंबई राष्ट्रीय विमानतळ ते स्वारगेट अशी वातानुकूलित शिवनेरी बस सेवा १६ डिसेंबर २०१९ पासून सुरू करण्यात आली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ५२५ रुपये तिकीट दर असलेल्या शिवनेरीच्या दिवसाला १८ फेऱ्या होतात. आतापर्यंत या सेवेचा २ हजार ९२८ प्रवाशांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे प्रतिदिन ३५ ते ४४ प्रवासी प्रवास करत आहेत. यामधून एसटी महामंडळाला १५ लाख ७७ हजार ६२५ रुपये महसूल मिळाल्याची माहिती देण्यात आली.

राष्ट्रीय विमानतळावरून असलेल्या शिवनेरी सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरूनही अशाच प्रकारची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला विमानतळ प्रशासनानेही मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या राष्ट्रीय विमानतळमार्गे जाणारी सेवा ही बोरीवली, सायन अशी आहे. बोरीवली, पवईमार्गे जाणारी शिवनेरी सेवाही असून त्याला कमी प्रतिसाद आहे. ही सेवा आंतरराष्ट्रीय विमानतळमार्गे स्वारगेटसाठी चालवली जाईल, असे सांगितले. त्याच्या दिवसाला आठ ते नऊ फेऱ्या होतील.