जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पकड असलेल्या नागपूरमध्येच भाजपाला धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं विजय संपादन करत भाजपाच्या बालेकिल्ल्यालाच हादरा दिला आहे. “निवडणूक टाळणाऱ्या भाजपाचा जनतेने पराभव केला. दिग्गज नेते असलेल्या नागपुरातच भाजपाचा पराभव झाला आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निकालानंतर व्यक्त केली.

नागपूर जिल्हा परिषदेचे निकाल बुधवारी जाहीर झाले. मतदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडत भाजपाच्या विरोधात कौल दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावातही भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागले आहे. येथे काँग्रेस उमेदवार विजयी झाला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला चिमटे काढले आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना जिल्हा परिषद निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणूक वारंवार पुढे ढकलली जात होती. भाजपा निवडणूक टाळत होती. मात्र, आज निवडणूक झाली. जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या पारड्यात आपले मत टाकले. विदर्भात भाजपाचा आज पराभव झाला आहे. ज्या नागपुरात भाजपाचे दिग्गज नेते आहेत. जिथे भाजपाची चांगली पकड होती. त्याच नागपुरात भाजपाचा पराभव झाला आहे,” अशी टोला पाटील यांनी लगावला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ आणि १३ पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी जिल्ह्यात मंगळवारी मतदान झाले. ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बुधवारी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर भाजपाला धक्का बसणार असल्याचे कल येण्यास सुरू झाले. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झालं. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपाने सहा जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसने १२ आणि राष्ट्रवादीने सहा जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि शेकपाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.