काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्याकडे हत्यारे सापडली होती. ही हत्यारे कशासाठी होती? दंगल घडवण्यासाठी होती का ? असे सवाल विचारत हत्यारांची गरज काय हे आरएसएस भाजपाने सांगावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आरएसएस सुरक्षित आहे तर मग हत्यारे कशासाठी ? एखाद्या मुस्लिम व्यक्तीकडे हत्यारे मिळाली असती तर त्याला दहशदवादी म्हणून घोषित केले असते असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडी मेळाव्यातील जाहीर सभेत बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, ‘आरएसएसच्या कार्यकर्त्याकडे हत्यारे मिळाली तर ते दहशतवादी आहेत असं का म्हणू नये. सनातनकडे बॉम्ब मिळाले, मात्र यावर कोणी बोलायला तयार नाही. याठिकाणी दोन मापदंड आहेत. हे समांतर सरकार आहे. या समांतर सरकाच्या विरोधात काँग्रेसने पाऊल उचलली नाहीत. आरएसएसला चौकटीत कसं आणायचं याचा आराखडा द्या, त्यानंतर जागा वाटपावर समझोता करू. परंतु यावर काँग्रेस बोलायला तयार नाही. ते एमआयएमच्या पाठीमागे लपले आहेत. देशातील खरा प्रश्न म्हणजे दोन वेगवेगळे प्रशासन चालतात. एक राज्यघटनेच्या अंतर्गत राष्ट्रपती आणि त्याला समांतर शासन मोहन भागवत चालवतात’.

प्रियंका गांधींमध्ये इंदिरा गांधी दिसतात तर प्रकाश आंबेडकर यांच्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर दिसत नाहीत का? असा सवाल यावेळी आमदार इम्तियाज जलील विचारला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, पोलिसांनी भाजपाला सुरक्षा दिली पाहिजे कारण जनतेचे काही खरं नाही.