राज्यात दिवसभरात नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा दीडपट अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. तर, दुसरीकडे करोनाच्या नव्या स्ट्रेनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी तो तितका धोकादायक नसल्याने चिंतेची बाब नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात २,४३८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४,२८६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १९,७१,५५२ इतकी झाली असून आजवर १८,६७,९८८ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आत्तापर्यंत ५०,१०१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात सध्या ५२,२८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात दिवसभरात १४० रुग्णांची नोंद, तिघांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात १४० करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आजअखेर शहरात १ लाख ८१ हजार ६५१ इतके करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवर मृत्यू झालेल्यांची संख्या ४ हजार ६८२ वर पोहोचली आहे. दरम्यान, १४४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आजअखेर १ लाख ७४ हजार २८७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.