कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयासमोर असलेली न्यायालयाची जुनी रिकामी अवस्थेतील इमारत करोना उपचारासाठी वापरण्यास मिळवी या मागणीसाठी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने पंचगंगा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. तसेच, यामध्ये खोडा घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देत, राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक पंचगंगा नदीत विसर्जन केले गेले.

कोल्हापूरमध्ये करोना संसर्ग झपाट्यसाने वाढत आहे. उपचाराअभावी रुग्णांना जीव गमवावे लागत आहेत. जिल्हा रुग्णालय असलेल्या सीपीआर समोर जिल्हा न्यायालयाच्या इमारती पूर्णपणे धुळखात कुलूप बंद आहेत. त्या तात्पुरत्या वापरात घेऊन त्या ठिकाणी सीपीआरचे विस्तारीकरण करावे, अशी कृती समितीची मागणी आहे. मात्र राज्य शासनाच्या मुख्य सचिव व काही अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी या इमारतीची कोणी वैद्यकीय उपचारासाठी मागणी करु नये, असे आदेश काढले आहेत.

या अधिकाऱ्यानी कोल्हापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाचे अधिकारी मनमानी करुन अनेकांच्या जीवाशी खेळ करत आहेत, असा आरोप करत समितीने त्यांचा आज निषेध केला. आंदोलनात अशोक पवार रमेश मोरे, दिलीप देसाई, रामभाऊ कोळेकर, उदय भोसले यांच्याश कार्यकर्ते सहभागी झाले होते.