सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील पराभव, नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या मतदानामध्ये झालेली लक्षणीय घट, इस्लामपुरातील मानहानिकारक पराभव आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विरोधकांकडून केली जात असलेली राजकीय कोंडी यातून मार्ग काढण्यासाठीच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कथित दूरध्वनीचा गौप्यस्फोट तसेच शिवस्मारकाबाबत जातीय विधाने केल्याचे बोलले जात आहे. यामागे जसा राजकीय संधिसाधूपणा आहे, तसेच मतांसाठीची हतबलताही असल्याचे दिसत आहे.

दोन महिन्यांपूर्वी अ‍ॅट्रॉसिटीविरोधात आणि ओबीसी आरक्षणासाठी राज्यात विविध ठिकाणी सकल मराठा मोच्रे काढण्यात आले होते. हे मोर्चे जरी राजकारणविरहित दाखवण्यात आले असले तरी यामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप सर्वत्र उघडपणे होत आहेत. समाजात गेलेल्या या संदेशामुळे दलित आणि इतर मागासवर्गीय समाज या पक्षापासून दूर गेला आहे. या दोन समाजाबरोबरच ‘एमआयएम’मुळे मुस्लीम मतदारही राष्ट्रवादीपासून दुरावल्याने गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाला याचा मोठा फटका बसत आहे. या साऱ्यातून या पक्षाची सध्या सर्वत्रच अस्तित्वाची लढाई सुरू आहे. सांगली जिल्ह्य़ातदेखील पक्षाचा बालेकिल्ला असतानाही विधान परिषदेपासून ते नगरपालिका निवडणुकांपर्यंत राष्ट्रवादीला मोठय़ा पराभवास सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीच्या या पीछेहाटीतून जयंत पाटील यांच्याही जिल्ह्य़ातील सत्तेला एकप्रकारे ग्रहण लागले आहे. बदलती राजकीय स्थिती आणि सर्व विरोधकांची एकी ही राजकीय कोंडी फोडण्यासाठीच जयंत पाटलांकडून गेल्या काही दिवसांत पद्धतशीरपणे काही सूचक विधाने केली जात आहेत. यातील ‘मंत्रिपद मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकण्याची विनंती करणारा दूरध्वनी खोत यांनी केला’ किंवा ‘ज्यांच्या दहा पिढय़ांचा शिवाजी महाराजांशी संबंध नाही अशांनी शिवस्मारकाचे भूमिपूजन करावे’ ही त्यांची दोन विधाने सध्या राजकीय पटलावर चांगलीच गाजत आहेत. पण त्यामागे पक्षहितापेक्षाही स्वहिताचे राजकारण मोठे दडले असल्याचे बोलले जात आहे. खोतांबाबतच्या विधानांमधून स्वपक्षाबरोबरच भाजपबरोबरही आपले कसे चांगले संबंध आहेत हे दाखवून जयंत पाटील दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार याबद्दल गेले वर्षभर अनेकदा चर्चा घडल्या आहेत. मध्यंतरी महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनीही उपरोधिकपणे त्यांनी लवकरात लवकर पक्षप्रवेश करावा, असे विधान केले होते. या साऱ्या पाश्र्वभूमीवर जयंत पाटलांनी केलेल्या विधानामुळे जिल्ह्य़ातीलच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

त्यांनी शिवस्मारकाबाबत केलेले दुसरे वक्तव्य मात्र पुन्हा जातीय मतांच्या राजकारणातून असल्याचे बोलले जात आहे. ‘ज्यांच्या दहा पिढय़ांचा शिवाजी महाराजांशी संबंध नाही अशांनी शिवस्मारकाचे भूमिपूजन करावे’, असे त्यांनी केलेल्या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या राज्यकर्त्यांच्या जातीवर चर्चा घडवून आणली आहे. या विधानातील राजकीय हेतूंमुळेच त्यांना यावर लगेच कुणाकडूनही पाठिंबा मिळाला नाही. या दोन्ही विधानांतून जयंत पाटील यांचा समाज, मतदार, विरोधक आणि काही प्रमाणात स्वपक्षातील लोकांचा राजकीय गोंधळ निर्माण करण्याचाच प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. यामागे जसा राजकीय संधिसाधूपणा आहे, तसेच मतांसाठीची हतबलताही असल्याचे दिसत आहे, परंतु विरोधकांनी मात्र या साऱ्या चर्चेला दूर सारले आहे. गेली पंधरा वर्षे सत्ता हाती असताना कुठला विकास केला याचीच सार्वत्रिक विचारणा होत असल्याने ही सारीच विधाने पुन्हा केवळ राजकीय टीका ठरण्याची लक्षणे आहे. विधान परिषदेपाठोपाठ नगरपालिका निवडणुकीतील पक्षाचा जनाधार घट यामागील खऱ्या कारणांचा शोध घेण्यापेक्षा विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण करून तात्कालिक लाभ उठविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही अनेकजण बोलत आहेत.