व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून विमा कंपन्या अनेक सबबी सांगून जबाबदारी टाळत आहेत. सरकारने या कंपन्यांना समज देऊन व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास भाग पाडायला हवे. ज्यांचा इन्शुरन्स नाही, अशा व्यापाऱ्यांनाही पुन्हा उभारी देण्यास शासनाने पूर्ण मदत करायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगली येथे बुधवारी  केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे कोल्हापूर जिल्ह्यच्या दौऱ्यावर आले असून सांगली येथील व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. ते राज्य व केंद्र शासनाशी चर्चा करून निश्चितपणे काहीना काही मार्ग काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमदार पाटील यांनी आज दुपारी सांगली येथील गणपती पेठ, हरभट रोड  येथील व्यापारी पेठेस भेट देऊन पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करून व्यापाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या. या वेळी संजय बजाज, विराज कोकणे, सागर घोडके आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

आ.पाटील यांनी गणपती पेठ, हरभट रोड येथे फिरून दुकानांना भेट देत व्यापाऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. या वेळी त्यांनी काही दुकानात जाऊन मालाचे नुकसान पाहिले. व्यापाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती देत भिजलेला,निरोपयोगी झालेला मालही त्यांना दाखविला. आ.पाटील यांनी या वेळी स्वच्छता कर्मचारी व आशा वर्कर्स यांच्याकडून कामाची माहिती घेतली.

आ.पाटील म्हणाले,अतिशय गंभीर परिस्थिती आहे. संपूर्ण व्यापारी पेठ व व्यापारी उद्ध्वस्त झाला आहे. मात्र सरकार तितके गंभीर दिसत नाही. शासनाकडून साधी चौकशी करायला कोणी इकडे फिरकलेले नाही. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत.

विमा कंपन्या तुमचा पुराचा इन्शुरन्स नव्हता, आगीचा होता अशा सबबी सांगून जबाबदारी टाळत आहेत. सरकारने यात हस्तक्षेप करीत कंपन्यांना समज देऊन नुकसान भरपाई देण्यास भाग पडावे. ज्यांचा इन्शुरन्स नाही,त्यांना उद्योग पुन्हा उभा करण्यास पूर्ण मदत करावी.