रविवारनं राज्यासाठी एक दिलासादायक बातमी दिली. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आव्हाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचाराच्या मदतीनं जितेंद्र आव्हाड यांनी करोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली असून, ते घरीही पोहोचले आहेत.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सातत्यानं फिरतीवर असणाऱ्या अनेक व्यक्तींना करोनाचा संसर्ग होत असल्याच्या घटना समोर आल्या. यात माध्यमांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता. त्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याची चाचणीतून निष्पन्न झालं. करोनाचं निदान झाल्यानंतर आव्हाड यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर जिद्द व उपचाराच्या मदतीनं आव्हाड यांनी करोनावर मात केली आहे. आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. “गेल्या काही दिवसांपासून करोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईला यश आलेलं असून, मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढेही तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहु द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

१२ एप्रिल रोजी वृत्तवाहिनीच्या ठाण्यातील एक पत्रकार, कॅमेरामॅन, तीन पोलीस शिपाई आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. हे सर्व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आले होते. एका पोलीस आधिकाऱ्याच्या संपर्कात आव्हाड आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळफास १४ जणांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.