काजीपेठ-मुंबई नवीन साप्ताहिक रेल्वे आदिलाबाद माग्रे मराठवाडय़ातून धावणार आहे. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी सुविधा निर्माण झाली आहे. सप्टेंबरनंतर ही रेल्वे कायमस्वरूपी धावेल, अशी माहिती भारतीय रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत जनबंधू व मध्य रेल्वेचे परिवहन प्रबंधक ब्रिजेश रॉय यांनी दिली.
गेल्या आठवडय़ात नवी दिल्लीत १६ झोन विभागप्रमुखांची बठक झाली. रेल्वे अंदाजपत्रकात घोषित सर्व गाडय़ांच्या मार्गाबाबत निर्णय घेण्यात आला. यात काजीपेठ-मुंबई व बिदर-मुंबई या दोन साप्ताहिक गाडय़ांचा समावेश आहे. काजीपेठ-मुंबई ही गाडी आदिलाबाद माग्रे किनवट, मूदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड ते मुंबई अशी धावणार आहे. बिदर-मुंबई ही साप्ताहिक गाडी लातूर, उस्मानाबादवरून पुणेमाग्रे मुंबईला पोहोचणार आहे. नांदेड-बिकानेर साप्ताहिक रेल्वे पूर्णा, िहगोली, अकोलामाग्रे धावणार आहे. नांदेड-बिकानेर परभणी, औरंगाबाद माग्रे नेण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटना, प्रजापिता ब्रम्हकुमारी परभणी आदींनी केली आहे.
‘मानवरहित क्रॉसिंगवर गेटकीपर नेमावेत’
देशभरात अंदाजे १५ हजार मानवरहित क्रॉसिंग असून, दरवर्षी या ठिकाणी शेकडो निष्पाप लोकांचा बळी जातो. मानवरहित क्रॉसिंगवर होणाऱ्या दुर्घटनेला रेल्वे प्रशासनच जबाबदार असून या ठिकाणी गेटकीपर नेमण्याची मागणी स्वातंत्र्यसनिक प्रभाकर वाईकर, अरुण मेघराज, डॉ. राजगोपाल कालानी, अॅड. माधुरी क्षीरसागर, सुरेश छत्रपती आदींनी केली.