कालेश्वरम-मेडीगट्टा धरणामुळे तेलंगणातील हजारो एकर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार असल्याने आनंदित झालेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा मेडीगट्टा येथे पुतळा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. याउलट, सिरोंचा तालुक्यातील २१ गावे या धरणात बुडणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जनमत तयार केले जात आहे. एकाच प्रकल्पावरून एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जनता पुतळा उभारत आहे, तर दुसऱ्या राज्याचा मुख्यमंत्री टीकेचे लक्ष्य झालेला आहे.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर सिरोंचा तालुक्याजवल गोदावरी नदीवर हे धरण बांधले जाणार आहे. २ मे रोजी या धरणाचे भूमिपूजन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे हस्ते झाले. या धरणातील पाण्यामुळे तेलंगणातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. ते शेतकरी आर्थिक दृष्टय़ा समृध्द होतील. या धरणाचे भूमिपूजन होताच या परिसरातील लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. यातच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पूर्णाकृती पुतळा तयार करण्यात आला असून लवकरच तो मेडीगट्टा येथे बसविण्यात येणार आहे. याउलट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाबाबत ठोस भूमिका न घेतल्यामुळे या भागातील जनता त्यांच्यावर कमालीची संतापली आहे. सिरोंचा व परिसरातील २१ गावे या धरणाच्या पाण्याखाली बुडणार आहेत. तेलंगणासोबत सामंजस्य करार करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायला हवी होती. मात्र, आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाचे भूमिपूजन केले याची आम्हाला माहितीच नव्हती. मुख्यमंत्री फडणवीस यांना अंधारात ठेवण्यात आले. या प्रकल्पासंदर्भात तेलंगणाची केंद्राकडे तक्रार करू, असे महाजन यांचे म्हणणे आहे. वस्तुस्थिती काहीही असो मात्र, सीमावर्ती भागात राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस व भाजप सरकारविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्र्यांपासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वावरच अतिशय वाईट शब्दात स्थानिक आदिवासी टीका करीत असल्याचे चित्र आहे.