“कांजूरमार्ग मेट्रो कारशेड जागेला कोर्टाने स्टे दिला असला, तरी त्याची अंतिम सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. परंतु आरे वनाच्याविरोधी जे लोक आहेत, त्यांना उकळ्या फुटण्याचे कारण नाही,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला आहे.

नव्यानं प्रस्तावित असलेल्या कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपानं ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. भाजपाकडून होत असलेल्या टीकेला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “न्यायालयाचे असे निर्णय होत असतात. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याचं राजकीयकरण करण्याची आवश्यकता नाही. सरकारने जी पावलं उचलली त्यासंबंधात कुणी न्यायालयात गेलं आणि न्यायालयात गेल्यावर न्यायालयानं वेगळा निर्णय दिला असला, तरी अंतिम निर्णय लागलेला नाही. ती जमीन सरकारची आहे की, नाही त्यात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे न्यायालयाला वेळ हवा आहे म्हणून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. अंतिम तारीख फेब्रुवारीमध्ये आहे,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

“मुंबईच्याजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठं वन असणं हे मुंबईकरांसाठी फार भाग्याचं आहे. आणि त्याच वनांमध्ये वेगवेगळे प्रकल्प करायला लागलो, तर पर्यावरणाची हानी होते. सरकारने ती भूमिका घेतली आहे आणि पूर्वी ठरलेलं होतं त्यात काही बदल केले, तर त्यावर आकांडतांडव करण्याची गरज नाही. आरेमध्ये आधीच अतिक्रमण झालं आहे. त्याच्यात आणखी वाढ होतेय. त्यात आणखी होवू नये म्हणून पर्यावरणमंत्र्यांनी भूमिका घेतली, परंतु आता राजकीय हितासाठी काही लोक आकांडतांडव करत आहेत. प्रत्येकाला प्रत्येक निर्णयात राजकारण करायचं असेल तर त्याला काही इलाज नाही,” असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला.