पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याद्वारे देशाला हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील २२५ एकर जमीनीवर स्थानिक शेतकऱ्यांनी शनिवारी कब्जा केला. तसेच ट्रॅक्टर आणि बैलजोड्या आणून त्यांनी ही जमीन नांगरुन घेतली. आता उद्यापासून या जागेत आपण शेती करणार असल्याचे या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीरव मोदी फरार असल्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने त्याच्या संपत्तीवर टाच आणली आहे. त्याची दागिन्यांची दुकाने तसेच जमिनी आणि इतर मालमत्ताही जप्त केल्या आहेत. त्यात कर्जत तालुक्यातील या जमीनीचाही समावेश आहे. या जमीनीची मुळ कागदपत्रे ही ईडीच्या ताब्यात आहेत.

मात्र, असे असले तरी कर्जतमधील शेतकऱ्यांनी देशाला फसवणाऱ्या नीरव मोदीला धडा शिकवायला हवा अशी भुमिका घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी ‘आई मुक्ती संग्राम’ या नावाखाली आंदोलन करीत त्यांच्या जमीनीवर नांगर फिरवला असून उद्यापासून ती कसण्याचा मानस व्यक्त केला आहे. आज ही जमीन नांगरत असताना या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवर राष्ट्रध्वज फडकावत नीरव मोदी विरोधात निषेधाच्या घोषणाही दिल्या.

यापूर्वी देखील इथल्या शेतकऱ्यांनी ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आज पुन्हा या जमीनीवर एकत्र जमून ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या होत्या.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karjat based farmers take charge of nirav modis land of 225 acers and plunge with tractor
First published on: 17-03-2018 at 15:48 IST