महाडच्या करंजाडीजवळ मालगाडीचे डब्बे घसरल्याने खंडित झालेली कोकण रेल्वे सेवा पुन्हा एकदा रुळावर आणण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. तब्बत २५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सोमवारी सकाळी आठच्या सुमारास रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
रविवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास मालगाडीचे आठ डब्बे घसरल्याने कोकण रेल्वे सेवा ठप्प झाली होती. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाडय़ा ठिकठिकाणी अडकून पडल्या होत्या, तर काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. अपघातानंतर खंडित झालेली रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. दोन अपघात नियंत्रण पथक ट्रेन्स या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. १४० टन क्षमतेच्या क्रेन्सच्या मदतीने रेल्वे मार्गावर पडलेले आठ डब्बे बाजूला करण्यात आले. त्यानंतर रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सलग २५ तास चाललेल्या या मोहिमेत साडेचारशे कामगार आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि तंत्रज्ञ सहभागी झाले. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर कोकण रेल्वेचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
खंडित झालेली रेल्वे सेवा सुरू करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले असले तरी रेल्वे सेवा सुरळीत होण्यासाठी आणखीन काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास करंजाडी येथून भावनगर कोच्चीवेली एक्स्प्रेस रवाना झाली. त्यानंतर मत्स्यगंधा एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. दोन्ही गाडय़ा सुखरूप रवाना झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, सोमवारी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर, दादर-रत्नागिरी पॅसेंजर, जनशताब्दी एक्स्प्रेस ह्य़ा गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या.