मागील दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, सोमवारपासून कोकणापासून विदर्भापर्यंत दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाडा-विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत विश्रांती घेतलेल्या पावसाला मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पोषक वातावरण मिळाले होते. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली होती. मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र विरून जात ते उत्तरेच्या दिशेने सरकले. त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाला मिळाले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

अपेक्षेनुसार बंगालच्या उपसागरामध्ये सध्या राज्यातील पावसासाठी पोषक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे रविवारी त्याची तीव्रताही वाढली आहे. हे क्षेत्र उत्तर-पश्चिम ओडिशा येथे स्थिर होते. मात्र, ते आता राज्याच्या जवळ येण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्याच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २७ ऑगस्टला कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे. २८ ऑगस्टला कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, मागील चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर कोकण, विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. लोणावळा ७० मि.मी; महाबळेश्‍वर ६० मि.मी; ताम्हिणी १२० मि.मी; श्रीवर्धन ३० मि.मी; अलिबाग २० मि.मी; मुंबई ९ मि.मी; पुणे ८.१ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.