राष्ट्रवादीचे क्षीरसागर बंधू जवळ तर विनायक मेटे दूर

वसंत मुंडे, बीड

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Kachathivu Island
लेख: निवडणूक प्रचारात कचाथीवूचा शंखनाद!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

भाजपप्रणीत महायुतीतील घटक पक्षाचे आमदार विनायक मेटे यांना काहीसे दूर ठेवत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना सोबत येण्याचे दिलेले जाहीर निमंत्रण नव्या राजकीय समीकरणांची नांदी मानली जात आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सहाही विधानसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना गळाला लावून मंत्री मुंडे यांनी विरोधकांची पुरती कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात कोणीच कोणाचा कायम विरोधक आणि सहकारी राहत नसल्याचा प्रत्यय बदलत्या समीकरणातून पुन्हा एकदा येऊ लागला आहे. पाच वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेसह विधानसभेच्या पाच जागा भाजपला मिळाल्या. बीड मतदारसंघात भाजप महायुतीतील घटक पक्षाचे आमदार विनायक मेटे यांचा निसटता पराभव होऊन राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर विजयी झाले. दरम्यान मेटे यांना विधान परिषदेवर घेऊन भाजपने आमदारकी कायम ठेवली. परिणामी आमदार मेटे यांनी क्षीरसागरांना लक्ष्य करत मतदारसंघात संघटना बांधणीवर जोर दिला. दुसरीकडे मंत्री मुंडे व मेटे यांच्यातील राजकीय समन्वय वर्षभरातच कमी झाल्याचे काही घटनांवरून दिसून आले. पालकमंत्री मुंडेंना टाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार मेटेंच्या कार्यक्रमाला बीडमध्ये हजेरी लावल्यानंतर दोघांमधील मतभेद ठळकपणे समोर आले. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत आमदार मेटेंनी मंत्री मुंडे यांना साथ दिल्याने मतभेद मिटल्याचे दोघांनीही सांगितले होते. दरम्यान काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेतील कारभाराची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून शिवसंग्रामच्या सदस्यांनी मंत्री मुंडेंवर निशाणा साधला. सभागृहातही भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्याने दोघांतील मतभेद पुन्हा ताणल्याचे स्पष्ट झाले. राज्य मंत्रिमंडळात आमदार मेटेंच्या समावेशाला मंत्री मुंडेंचाच विरोध असल्याचा शिवसंग्रामकडून उघडपणे आरोप केला जातो. या पाश्र्वभूमीवर मागील आठवडय़ात जिल्हा नियोजन समितीच्या बठकीत आमदार विनायक मेटे यांच्याकडे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दुर्लक्ष केल्याची सल शिवसंग्रामच्या सदस्यांनी व्यक्त केली.

घटक पक्षाचे आमदार विनायक मेटे यांच्याबरोबर राजकीय दुरावा वाढत असतानाच मंत्री मुंडे यांनी राष्ट्रवादीत दोन वर्षांपासून अस्वस्थ असलेल्या आमदार जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या व्यासपीठावर जाहीर हजेरी लावत विकासासाठी सोबत येण्याचे निमंत्रण दिले. बीड मतदारसंघात आमदार मेटे व क्षीरसागर कट्टर विरोधक. राष्ट्रवादी अंतर्गत क्षीरसागर बंधू आणि धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित यांच्यातून विस्तव जात नाही. या पाश्र्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री सुरेश धस यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार करत मंत्री मुंडे यांनी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. तर क्षीरसागर बंधूंना राजकीय बळ देत घटक पक्षांतर्गतचे आमदार विनायक मेटे यांनाही योग्य तो संदेश दिला आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला खिळखिळे करत नवीन समीकरणे जुळवण्यास सुरुवात केल्याचेच चित्र आहे. बीड विधानसभा मतदारसंघात क्षीरसागर बंधूंना तर आष्टी मतदारसंघात भाजपचे आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार साहेबराव दरेकर या तिन्ही दिग्गजांना एकत्र केले. तर माजलगावमध्ये भाजपचे आमदार आर. टी. देशमुख यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे मोहन जगताप, गेवराईत भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्याबरोबर शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांना जिल्हा परिषदेत सोबत घेतले आहे. तसेच यापूर्वीच राष्ट्रवादीचे रमेश आडसकर यांना पक्षात घेऊन ताकद वाढवली आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील दिग्गजांना सोबत घेत विरोधकांची पुरती कोंडी करण्याचा प्रयत्न मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्याचे मानले जात आहे.