News Flash

निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नांदेड विरुद्ध लातूर वादाला फोडणी!

संभाजी निलंगेकर-पाटील यांच्याकडे भाजपने नांदेड महानगरपालिकेची जबाबदारी सोपविली

कामगारमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील

लातूर जिल्ह्य़ात काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देणारे कामगारमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांच्याकडे भाजपने नांदेड महानगरपालिकेची जबाबदारी सोपविली, पण निलंगेकर यांच्यामुळे नांदेड-लातूर वादाचे पडसाद नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उमटू लागले आहेत. नांदेडला विरोध करणाऱ्या लातूरकरांना नांदेडकर साथ देणार का, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदी असताना नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विलासराव देशमुख यांनी विरोध केला होता. तेव्हापासून नांदेड विरुद्ध लातूर हा वाद सुरू झाला. हा वाद अजूनही कायम असून, नांदेड महापालिका निवडणुकीत पुन्हा या वादाला फोडणी देण्यात आली आहे.

भाजपला लातूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत सत्ता मिळवून देणारे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना पक्षाने नांदेड मनपासाठी प्रभारी केले असून आपल्या पहिल्याच दौऱ्यात त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. पण दुसऱ्याच दिवशी स्थानिक पातळीवर निलंगेकरांवर रोष व्यक्त झाला. नांदेडसाठी मंजूर झालेले विभागीय आयुक्तालय लातूरकरांनी रोखले तसेच मुंबई-लातूर रेल्वे नांदेडपर्यंत आणण्याच्या निर्णयात लातूरकरांनी खोडा घातला. या मुद्यावर शिवसेनेने निलंगेकरांना जाब विचारला असून दुसऱ्या बाजूला काँग्रेस आमदार अमर राजूरकर यांनीही त्यांना फटकारले. जो आपल्या आजोबांचा होऊ शकला नाही, तो नांदेडकरांचा कसा होणार, असा सवाल राजूरकर यांनी केला. वास्तविक नांदेड आयुक्तालयाला विरोध किंवा लातूर गाडी नांदेडमध्ये विस्तारणीकरणास झालेला विरोध याच्याशी संभाजीरावांचा तसा काहीही संबंध नाही. पण नांदेड विरुद्ध लातूर असा वाद उकरून काढून भाजपची कोंडी करण्याची खेळी काँग्रेस आणि शिवसेनेने केली आहे.

नांदेडमध्ये निवडणुकीचे वारे वारू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या इमारतींवरील लोखंडी चौकटींवर भाजपचे डिजिटल फलकही लक्ष वेधून घेत आहेत. दिल्लीत कमळ, राज्यात कमळ, नांदेडमध्येही कमळ’ ही पक्षाची नवी घोषणा जवळपास सर्व फलकांवर दिसून येते. त्याचवेळी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने नांदेड नगरीचा उद्धार आम्हीच करू शकतो, असा दावा या पक्षाकडून सुरू झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने भाजपच्या स्थानिक नेत्यांना उद्देशून एक साधा सवाल केला. एक सत्कार घडवून आणता आला नाही, ते संपूर्ण महानगराचा काय उद्धार करणार असा हा सवाल आहे.

त्यामागची पाश्र्वभूमी अशी की  काँग्रेस पक्षातून भाजपत गेलेले माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा काही महिन्यांपूर्वी वाढदिवस साजरा झाल्यानंतर याच पक्षातील त्यांच्या समर्थकाने पोकर्णा यांच्या गौरवासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करून त्यांचा नागरी सत्कार घडवून आणण्याची मांडणी केली. त्यासाठी पहिल्याच बठकीत चर्चा-विचारविनिमय होऊन भास्करराव खतगावकर यांना स्वागताध्यक्ष करण्यात आले. भाजपच्या इतर प्रमुख नेत्यांना नियोजित कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे ठरले. हा सत्कार सोहळा म्हणजे मनपा निवडणुकीची पूर्वतयारीच, असाही विचार काहींनी केला आणि पावसाळा सुरू होण्याआधी हा भव्य कार्यक्रम उरकण्याचे एप्रिलमध्ये ठरले होते. नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना नियोजित कार्यक्रमाचे निमंत्रणही देण्यात आले.

आज त्या गोष्टीला चार महिने उलटून गेले आहेत. पावसाळा अखेरच्या टप्प्यावर आला आहे ; पण पोकर्णा यांच्या सत्काराचा मुहूर्त संबंधितांना काढता आला नाही. पोकर्णा यांच्या नियोजित सत्काराची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यावर विरोधकांचे त्याकडे लक्ष गेले. मग कोणी तरी पोकर्णा यांचे नेमके वय किती? याचा शोध सुरू केला. २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रावर पोकर्णा यांनी वय ६२ नमूद केले होते. आता ते पासष्टीत दाखल झाल्याने या टप्प्यावर एकसष्ठी कशी? असा मुद्दा उपस्थित झाला. मग सत्काराची चर्चा ओसरली आणि तयारी गुंडाळली गेली.

आता भाजपच्या नेत्यांनी पोकर्णा यांच्या सत्काराचा विषय थांबवून शहराच्या उद्धाराची भाषा सुरू केल्यानंतर काँग्रेसने एक सत्कार घडवून आणू न शकणारे शहराचा काय उद्धार करणार, असा टोकदार सवाल केला आहे.

नांदेडमध्ये स्थानिक निवडणुकांत एखादा साधा, छोटा मुद्दा मोठा होता. मनपाच्या मागील काही निवडणुकांत शिवसेना-भाजपने कधी एकत्रपणे तर कधी स्वतंत्रपणे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना लक्ष्य करून लढत दिली; पण हे दोन व अन्य पक्ष परिवर्तन घडवू शकले नाहीत. आताही भाजपने मोठा गाजावाजा करत निवडणुकीसाठी रणिशग फुंकतांना पुन्हा चव्हाण यांनाच लक्ष्य करण्याची झलक दोन दिवसांपूर्वी सादर केली. पण मनपाच्या ८१ जागा लढविण्यासाठी या पक्षाला शिवसेना व अन्य पक्षांचे कार्यकत्रे फोडून जमवाजमव करावी लागत असल्याचे चित्र साकारल्यानंतर नांदेडचे मतदार भाजपच्या शहर उद्धाराच्या फुग्यात हवा भरणार, का हा फुगा फोडणार ते पुढच्या टप्प्यात कळेल.

बहुमत कसे मिळवणार?

८१ जागांपैकी २० ते २५ जागा अशा आहेत की, जेथे भाजपला वाव नाही. उर्वरित  जागांमधून बहुमताचा जादुई आकडा (४१) गाठण्याचे आव्हान आहे. ज्यांच्या भरवशावर पक्षाने शहर उद्धाराचा संकल्प सोडला त्या चिखलीकर यांनी यापूर्वी २००७ मध्ये लोकभारती पक्षाच्या माध्यमातून खटाटोप केला होता; पण त्याचा फज्जा उडाला. लोहा नगर परिषदेत चव्हाण यांनी त्यांना खातंही उघडू दिलं नाही; पण आता थेट मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद घेऊन चिखलीकर अशोक चव्हाण यांच्याविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 2:08 am

Web Title: labor minister sambhaji patil nilangekar get nanded municipal corporation election responsibility
Next Stories
1 सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर!
2 जळगावमध्ये पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
3 धुळ्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
Just Now!
X