सावनेर मतदारसंघातील पारशिवनीपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील आवळेघाट येथे बुधवारी सकाळी आठच्या सुमारास अचानक वादळ व पाऊस सुरू होऊन मतदान केंद्रावर वीज पडून एका पोलीस हवालदार मृत्युमुखी पडला, तर तीन मतदार जखमी झाले. रवींद्र तुकाराम मानकर हे मरण पावलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून, तो नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात कवायत शिक्षक होता. रवींद्रच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे आहेत. तो उपनिरीक्षकाची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झाला होता. दरम्यान, वर्धा जिल्ह्य़ातही क्षीरसमुद्र येथे नाल्याला पूर आल्याने गृहरक्षक दलाच्या जवानांनी दोराच्या सहाय्याने मतदारांना बाहेर काढून केंद्रापर्यंत पोहोचविले.
 दुर्गम भागातील २०० घरांच्या आवळेघाटमधील मतदान केंद्रावर त्याला नियुक्त करण्यात आले होते. सकाळी आठच्या सुमारास अचानक वादळ व पाऊस सुरू झाल्याने मतदारांची धावाधाव सुरू झाली. रवींद्रही धावत आत जाण्याच्या प्रयत्नात असतानाच तेथे वीज कोसळली.
कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने सर्वच स्तब्ध झाले. दोन-तीन मिनिटांनंतर सर्व भानावर आले तेव्हा रवींद्र व तिघे खाली पडलेले होते.
मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी लगेचच नियंत्रण कक्षाला सूचना दिली. गावकरी धावत आले. सुमित्रा रामचंद्र चंदनखेडे ही वृद्ध महिला, संदीप मधुकर भोयर हा तरुण व बंटी देवीदास राऊत या मुलाला व रवींद्रला पारशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी रवींद्रला मृत घोषित केले. तीनही जखमींना नागपूरला पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. आरतीसिंह व इतर अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. दुपारनंतर रवींद्रचे पार्थिव टेका नाकामधील ग्रामीण पोलीस मुख्यालयात नेऊन तेथे त्याला मानवंदना देण्यात आली. त्याच्या कुटुंबीयांनी पार्थिव बुटीबोरीजवळील जांबळपानी गावातील घरी नेले.
वर्धा जिल्ह्य़ात दोन भावांचा मृत्यू
समुद्रपूर तालुक्यात बुधवारी सकाळी पोथरा शिवारात वीज पडल्याने दोन भावांचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली. समुद्रपूर तालुक्यास  पावसाचा चांगलाच फटका बसला. या वेळी शेतात काम करणारे विनोद उध्दव रोकडे व अनिल उध्दव रोकडे या दोन भावांचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू, तर दुर्गा अनिल रोकडे ही गंभीर जखमी आहे. हे रोकडे कुटुंबीय हिंगणघाट तालुक्यातील नरसाळा गावचे आहेत.  नाल्याला पूर आल्याने गृहरक्षक दलाच्या जवानांनी दोराच्या साहाय्याने मतदारांना बाहेर काढत केंद्रापर्यंत पोहोचविले होते.