“राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल”, अशी महत्त्वाची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अस्लम शेख यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. “राज्यात आपण कठोर निर्बंध आणले. पण तरीही केसेस कमी होत नाहीयेत. ऑक्सिजनचा तुटवडा दिसत आहे. बेड मिळत नाहीयेत. आज बरीच चर्चा झाल्यानंतर येत्या काही तासांत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन आणावा लागेल. आपण निर्बंध कठोर करत गेलो. ऑक्सिजनचा तुटवडा आणि वाढती रुग्णसंख्या पाहाता अखेर हा निर्णय घ्यावा लागला आहे. गाईडलाईन्स तयार करून तुम्हाला दिल्या जातील”, असं देखील अस्लम शेख यावेळी म्हणाले. राज्यात सातत्याने वाढणारे करोना रुग्ण आणि त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि बेड्सचा तुटवडा यावर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. यानंतर काही महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

“मुख्यमंत्री उद्यापासून लॉकडाऊन लागू करतील”

“लॉकडाऊन अत्यंत कडक असायला हवा अशी सगळ्यांचीच मागणी आहे. निर्बंध घालूनही रस्त्यावरून वाहनं फिरत आहेत. आम्ही सगळ्यांनीच मुख्यमंत्र्यांना तात्काळ कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून हे नियम लागू करतील. लॉकडाऊन हा काही आवडीचा विषय नाही. आज लोकांना बेड, ऑक्सिजन मिळत नाहीयेत. ऑक्सिजनच्या उत्पादनापेक्षा आपल्याला जास्त ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण होऊन लोकांचा उपचार न मिळता मृत्यू होईल. म्हणून ही चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला कठोर लॉकडाऊन करायचा आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

SSC Exams – राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!

 

मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार!

दरम्यान, लॉकडाऊन नेमका कसा असेल, याविषयी सविस्तर माहिती अस्लम शेख किंवा एकनाथ शिंदे यांनी दिली नसली, तरी हा कठोर लॉकडाऊन असेल, असे सूतोवाच त्यांनी नक्कीच केले आहेत. दरम्यान, लोकांना प्रवासामध्ये फार अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं म्हणतानाच अस्लम शेख यांनी सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद न करण्याचेही संकेत दिले. यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री जनतेला माहिती देतील, अशी माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.