लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या शुक्रवारी १६ मे रोजी सकाळी होत आहे. दुपापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील अनेकांच्या भ्रमाचा भोपळा फुटणार आहे. काँग्रेस की शिवसेनेचा उमेदवार बाजी मारणार हे महिनाभर सुरू असणारे पैजांचे समिकरण उघड होणार आहे. अनेक जण तळ्यात मळ्यात वावरत होते. अनेकांना भ्रम मतदानाच्या स्वरूपात उघड होणार आहे. अनेकांनी महिनाभर हातचलाखी करत विजयाचे गणीत मांडले होते. काहींनी तर दोन्ही बाजू मांडत विजयाचे शिल्पकार कोण असणार हे भासविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले.  काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा विजय कसा होणार? हे तारेवरची कसरत असल् यासारखे सांगणारे दुतोंडे या वेळी सर्वासमोर येणार आहेत. सर्वत्र शांतता असली तरी राजकीय पक्षाचे समर्थक उमेदवारांच्या विजयाचे भाकीत मांडत आहेत. पण सध्या देशात हवा वेगळीच असल्याने अनेक जण चिंतेत पडले आहेत.
या निवडणुकीतून मात्र अनेकांना अभ्यास करता येणार आहे. भूमिगत कोण होणार हे उद्याच्या मतमोजणीनंतर उघड होणार आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. नीलेश राणे व शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार विनायक राऊत या दोघांनाही विजयाची खात्री आहे. त्यांचे राजकीय समर्थकही विजयाची खात्री देत आहेत.
गेले महिनाभर खूप मस्करी करणाऱ्यांचे फावले होते; हवा येईल तसे बोलणारे काही जण दोन्ही दगडांवर पाय ठेवून होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील अफवांचे पीक शमले होते. या निकालातून कोणाला धक्का मिळणार? कोणाच्या अस्तित्वाच्या परीक्षेचा निकाल लागणार? या सर्व चर्चाना पूर्णविराम मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकांचा निकाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी घेऊन येणार आहे. त्यामुळे या निकालातून विधानसभेची समीकरणे स्पष्ट होणार आहेत, पण अनेक जण आमदारकीचे बाशिंग बांधून आहेत. त्यांचाही निकाल लागणार आहे.