मागील ३९ वर्षांपासून वीज जोडणी मिळाली नसल्याने बुलडाणा येथील शेतकऱ्याने १५ जून रोजी राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार यांच्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. माझ्या आजोबांनी वीज जोडणी मिळावी म्हणून १९८० मध्ये अर्ज केला होता. मात्र आम्हाला अजूनही वीज जोडणी मिळालेली नाही. आम्ही वीज जोडणी मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहोत, मात्र अद्यापही आम्हाला वीज जोडणी मिळू शकलेली नाही.

१५ जूनच्या संध्याकाळी या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ईश्वर सुपराव खराटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मलकापूर येथील कृषी प्रदर्शनात गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासमोर विष पिऊन या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याला उपचारांसाठी मलकापूर जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आमच्याकडे श्रीराम खराटे यांनी अर्ज केला होता, मात्र त्यानंतर ईश्वर खराटे यांना आम्ही डिमांड नोट पाठवली होती. डिमांड नोट २००६ मध्ये पाठवल्यानंतर जी रक्कम भरण्यास सांगितली होती ती ते भरू शकले नाहीत असं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न करूनही महावितरणच्या अधिकाऱ्याने त्याची भेट घेतली नाही. आपल्याला वीज जोडणी दिली जावी यासाठी शेतकऱ्याचे आजोबा श्रीराम खराटे यांनी अर्ज केला होता. त्यानंतर या शेतकऱ्याचे वडील सुपराव खराटे यांनीही वीज जोडणीसाठी पाठपुरावा केला. आता तिसऱ्या पिढीतील ईश्वर खराटे हे गेल्या अनेक वर्षांपासून वीज कनेक्शन द्यावे यासाठी आवाज उठवत आहेत. मात्र त्यांना अद्यापही वीज मिळू शकलेली नाही. शेतात वीज जोडणी न मिळाल्याने आपल्याला ५० ते ६० लाखांची नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी या शेतकऱ्याने केली. मात्र कोणत्याही मागणीकडे लक्ष देण्यात आले नसल्याने या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर मलकापूर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.