Maharashtra Budget 2020 : महाविकास आघाडी सरकारने आज पहिला अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडून राज्याच्या विकासासाठी काय काय करण्यात येईल याबाबत स्पष्ट केले. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींनी त्यांनी अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात केली. त्यानंतर अर्थसंकल्पातील पहिला आणि दुसरा टप्पा अजित पवार यांनी विस्तारीत वाचून दाखवला. अखेर सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी सादर करून त्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट केला.

वाचा त्या ओळी…

हाच माझा देश, ही माझीच माती,

येथले आकाशही माझ्याच हाती |

आणला मी उद्याचा सूर्य येथे,

लावती काही करंटे सांजवाती ||

तसेच, या ओळींनंतर जय हिंद, जय महाराष्ट्र असे म्हणत त्यांनी अर्थसंकल्प वाचनाचा शेवट केला.

दरम्यान, अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या बाबी मांडण्यात आल्या. अर्थसंकल्पात त्यांनी शैक्षणिक विभाग, रोजगार, शेतकरी, उद्योग, क्रीडा यासाठी निरनिराळ्या घोषणा केल्या. तसंच स्थानिकांना रोजगार देण्यासाठीही त्यांनी मोठी घोषणा केली. स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसंच राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- ‘या’ आहेत अर्थसंकल्पातील दहा महत्वाच्या घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ सदस्य म्हणजेच आमदारांना मोठा दिलासा दिला. त्यांच्या निधीत थेट ५० टक्के वाढ केल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी २०११ सालीही आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना आमदारांच्या स्थानिक विकास निधीत ६० लाखांची वाढ केली होती. त्यावेळी हा निधी दीड कोटी रूपयांवरून २ कोटी रूपये करण्यात आला होता.

आणखी वाचा- Maharashtra Budget 2020 : स्वस्त घराचं स्वप्न होणार पूर्ण; सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बाहेरून येणाऱ्या वाहनामुळे पुणे शहरात होणाऱ्या ट्राफिक कोंडीतून येत्या काळात मुक्ती मिळणार आहे. पुण्यात रिंग रोड उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात केली. अजित पवार यांनी सांगितले की, नाशिक, औरंगबाद, हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबई शहरातून येणार वाहतूक पुणे शहराबाहेरून वळवण्यासाठी १७० किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रस्तावित आहे. यासाठी भूसंपादनासह एकूण १५ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या वर्षी भूसंपादन सुरू करून येत्या चार वर्षांत हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.