महाराष्ट्रातील करोनाचा संसर्ग वेगानं फोफावत चालला आहे. मागील काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून, दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. रुग्णवाढीचा हा वेग कायम राहिल्यास पुढील काही दिवसांमध्ये राज्यात दररोज २० हजारांपर्यंत रुग्ण आढळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या देशात आढळून येणाऱ्या प्रत्येक ५ रुग्णांपैकी ३ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.

निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर लोकांकडून करोना प्रतिबंधात्मक उपायांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, मास्क वापराकडेही लोकांकडून काणाडोळा केला जात आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पुन्हा करोना संसर्गाने डोके वर काढले.

राज्यातील रुग्णसख्या वाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. गुरुवारी देशभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी पहिल्यांदाच ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. देशभरात २३ हजार २८५ रुग्ण आढळून आले. तर महाराष्ट्रात १४ हजार ३१७ रुग्ण आढळू आले होते. शुक्रवारी ही संख्या आणखी वाढली. शुक्रवारी राज्यात १५,८१७ इतक्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. यात मुंबईत १६४७, ठाणे जिल्हा १,१५३, नागपूरमधील १७२९ आणि पुण्यातील १८४५ रुग्णांचा समावेश आहे. कठोर निर्बंध लागू असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात शुक्रवारी ४१६ करोना रुग्ण आढळले आहेत.

म्हणजेच राज्यात जवळपास १६ हजार रुग्ण आढळून आलेत. पुढील काही दिवस देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी राज्यात ६० टक्के आढळून येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. राज्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली. त्यानंतर दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या दिशेने जात असल्याचं सांगण्यात आलं होतं. पुढील काही दिवस रुग्णसंख्येचा हा वाढता आलेख कायम राहणार असल्याची अंदाज व्यक्त केला जात आहे.