व्यापाऱ्यावर पाळत ठेवून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून सुमारे दीड लाख रुपयांना लुटण्यात आले. बाभळेश्वर रस्त्यावर नांदूरनजीक यादवमळा परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील विशाल भगवानदास भागवानी व संजय भगवानदास भागवानी या दोघांचा शहरात पिशव्या, बॅग व स्टेशनरी विक्रीचा घाऊक धंदा आहे. ते आठवडे बाजारातील विक्रेत्यांना मालाची विक्री करत असतात. त्यासाठी राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, कोल्हार व बाभळेश्वर येथील आठवडे बाजारात जाऊन वसुली करतात. काल राहाता येथील बाजार असल्याने वसुली घेऊन ते बाभळेश्वर रस्त्याने दुचाकीवरून शहराकडे येत होते.

भागवानी बंधूंच्या दुचाकीला यादवमळ्यानजीक तीन जणांनी अडविले. पण त्यांनी गाडी थांबविली नाही. त्यामुळे त्यांनी दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे भागवानी हे गाडीवरुन पडले. त्यांनी वसुलीच्या पशांची बॅग शेतातील गवतात फेकली. पण तोंडे बांधलेल्या लुटारुंनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गावठी पिस्तुलाचा कट्टा त्यांच्या डोक्याला लावून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. पशाची बॅग कुठे आहे हे विचारुन ती त्यांच्याकडून काढून घेतली. त्यानंतर त्यानी पोबारा केला. लुटारुंच्या तोंडाला फडके बांधलेले होते. लुटारु पळून गेल्यानंतर भागवानी यांनी आजूबाजूच्या लोकांची मदत घेतली. त्यानंतर ते शहर पोलीस ठाण्यात आले. मात्र हा भाग आपल्या हद्दीत येत नाही, असे सांगून पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेण्यास नकार दिला. लोणी पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली. पण त्यांनीही हद्दीचे कारण पुढे केले. आता  कोणाच्या हद्दीत हा गुन्हा घडला हे स्षप्ट झाल्यानंतर फिर्याद नोंदविली जाणार आहे.

लुटमार पुन्हा सुरू

बाभळेश्वर रस्त्यावर यापूर्वी लुटमारीच्या घटना घडत होत्या. पण पोलिसांनी काही सराईत गुन्हेगारांवर कारवाई केल्यानंतर त्या थांबल्या होत्या. आता पुन्हा एकदा या भागात लुटमारीच्या घटना सुरु झाल्या आहेत. हा रस्ता सुरक्षित राहिला नाही. त्यामुळे रात्री १० नंतर या रस्त्याने येण्यास लोक घाबरत आहेत.